संस्कृत,मराठी,हिंदी भाषा आणि रोजगारांच्या संधी

नवीन शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषांना दिलेल्या प्राधान्यमुळे स्थानिक भाषांचे महत्त्व पुन्हा वाढेल, अशी आशा भाषा अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

संस्कृत,मराठी,हिंदी भाषा आणि रोजगारांच्या संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

संस्कृत, (Sanskrit) हिंदी,  (Hindi)  मराठी, (Marathi)  पाली Pali अशा भारतीय भाषांकडे स्थानिकांचे Regional Language दुर्लक्ष होते, नकळत या भाषा मागे पडत आहेत. या भाषा शिकण्याकडे विद्यार्थी वर्गाचा कल काहीसा कमी आहे, अशी चिंता सतत व्यक्त होत असते. मात्र, नवीन शैक्षणिक धोरणात (NEP) स्थानिक भाषांना दिलेल्या प्राधान्यमुळे स्थानिक भाषांचे महत्त्व पुन्हा वाढेल, अशी आशा भाषा अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

   विद्यापीठातील व संलग्न महाविद्यालयातील भाषा विभागात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.याबाबत अनेक वेळा चिंता व्यक्त केली गेली. कारण भाषा विषयाचे शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणा-या रोजगाराच्या संधीना मर्यादा येत असल्याचे दिसून आले आहे.परंतु,पुढील काळात त्यात बदल होतील,असे या क्षेत्रातील तज्ञांना वाटते.'एज्यु वार्ता' शी बोलताना  "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य संदीप सांगळे म्हणाले, " मराठी ही आपली स्थानिक भाषा आहे, राज्य भाषा आहे पण स्थानिक लोक या भाषेकडे न्यूनगंड म्हणून पाहतात. मराठी शिकून काय होणार आहे,असा त्यांचा दृष्टिकोन आहे. पण आता चित्र बदलत आहे. पुणे विद्यापीठाने मराठीच्या संवर्धनासाठी महत्वाची पाऊले उचलले आहे. विद्यापिठाने मराठीच्या अभ्यासक्रमात वाङमय  आणि कौशल्याधारित शिक्षण असा दोन्हीची सांगड घातली आहे. सध्या विद्यापीठात शिकवत असलेल्या मराठीच्या अभ्यासक्रमात पत्रकारिता, स्क्रिप्ट रायटिंग, भाषांनंतर, मुद्रित शोधन,टंक लेखन, कथा लेखन असे विविध घटक शिकवले जात आहेत. त्यामुळे या विषयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. शिवाय नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेला आणखीन महत्व प्राप्त होईल, अशी आशा आहे.
   " सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी विभागाचे प्रमुख विजयकुमार रोडे म्हणाले, " सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे मुलांचा हिंदी भाषेकडे ओढा वाढत आहे. मोठ्या प्रमाणात अनुवादित साहित्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत आहे. याशिवाय हिंदी मधून स्क्रिप्ट रायटिंग, जाहिराती, मालिकांचे कथा लेखन,पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये खूप संधी उपलध होत आहेत.त्यामुळे विद्यार्थीही हा विषय आता गांभीर्याने घेत आहेत.शिवाय नवीन शैक्षणिक धोरणामुळे हिंदी भाषेच्या संवर्धनात सकारत्मक बदल होतील, असा विश्वास आहे. 

स. प.महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुख भारती बालटे म्हणाल्या," संस्कृत भाषेला संपूर्ण जगात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रदेशातील लोक आवर्जून त्यांच्या मुलांना संस्कृत भाषा शिवण्यासाठी प्रोत्साहित करतात. पण आपल्याकडे परिस्थिती मात्र काहीशी निराशाजनक होती. पण आता ही परिस्थिती बदलत आहे. संस्कृत भाषेच्या अभ्यासक्रमात रोजगाराभिमुख बदल होत आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे या भाषेला अधिक महत्व प्राप्त होणार आहे.शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात संस्कृत भाषेला खूप महत्व प्राप्त होईल. 
      महाविद्यालयातील संस्कृत विभागाबद्दल बोलताना बालटे म्हणाल्या, " पूर्वी  महाविद्यालयात संस्कृत भाषा शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अगदीच नगण्य होती. पण आता चित्र पालटले आहे. संस्कृत स्पेशल विषय घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या आता १५-२० पर्यंत वाढली आहे. पूर्वी ही संख्या ४ किंवा ५ वर होती. तर संस्कृतच्या सर्वसाधारण वर्गात ५० ते ६० विद्यार्थी आहेत.