Earn and Learn Scheme: कमवा व शिका मानधन वाढीचा लाभ विद्यार्थ्यांना नवीन वर्षात मिळणार

कमवा व शिका योजनेच्या वाढीव मानधन वितरणाबाबतच्या त्रुटींची पूर्तता केली जाईल.त्यामुळे येत्या जानेवारी महिन्यात विद्यार्थ्यांना वाढीव दराने मानधन मिळेल

Earn and Learn Scheme: कमवा व शिका मानधन वाढीचा लाभ विद्यार्थ्यांना नवीन वर्षात मिळणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)विविध विभागामधील व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेच्या (Earn and Learn Scheme) मानधनात वाढ (Remuneration increase) करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अद्याप विद्यार्थ्यांना वाढीव दरानुसार मानधन दिले जात नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केव्हा केली जाणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, "जानेवारी महिन्यात वाढीव दराने मानधन दिले जाईल. त्यासाठी येत्या २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल",असे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले.

 महाविद्यालयीन शिक्षण घणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व समजावे तसेच आर्थिक दूर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वकष्टातून काही रक्कम मिळावी, या उद्देशाने पुणे विद्यापीठातर्फे कमवा व शिका योजना राबवली जाते. विद्यापीठातील विभागामधील विद्यार्थी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होतो .परंतु, विद्यार्थ्यांना प्रती तास दिले जात असलेले ४५ रुपये मानधन कमी असून त्यात वाढ करावी, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटना व अधिसभा सदस्यांनी केली होती.त्यास विद्यापीठाच्या अधिसभेने व व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.त्यामुळे  कमवा व शिका योजनेचे मानधन प्रती तास ५५ रुपये झाले.परंतु,मानधन वाढीचा निर्णय होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही अद्याप वाढीव दरानुसार मानधन मिळाले नाही.त्यामुळे विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी लवकर करावी,अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा : Breaking News : विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटला

विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य संतोष ढोरे म्हणाले, अधिसभेत निर्णय घेऊनही सहा महिने मानधन वाढ झाली नाही.त्यात निर्णय घेतला तर त्यांची अंमलबजावणी केली जात नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विद्यापीठाने नवीन वर्षात विद्यार्थ्यांना वाढीव दराने मानधन वितरित केले नाही तर विद्यार्थी हिताचा विचार करून आंदोलन करावे लागेल.
-----------------------


"येत्या २७ डिसेंबर रोजी विद्यार्थी विकास मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्यात कमवा व शिका योजनेच्या वाढीव मानधन वितरणाबाबतच्या त्रुटींची पूर्तता केली जाईल.त्यामुळे येत्या जानेवारी महिन्यात विद्यार्थ्यांना वाढीव दराने मानधन मिळेल."

- डॉ.देविदास वायदंडे ,  व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ