RTE चा तांत्रिक घोळ सुरूच राहिल्याने प्रवेश रखडणार; संस्थाचालकांची नाराजी

मागील दोन दिवसांपासून आरटीई प्रवेशाचे  सर्व्हर अजूनही बंदच आहे आणि शाळाच्या पोर्टलवरही प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी अजून पाठवण्यात आलेली नाही.

RTE चा तांत्रिक घोळ सुरूच राहिल्याने प्रवेश रखडणार; संस्थाचालकांची नाराजी
RTE Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थी आणि पालकांसाठी बहूप्रतिक्षित शिक्षण हक्क कायदा ( RTE 2023) अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली खरी पण तांत्रिक त्रुटीमुळे प्रक्रिया रखडणार असल्याचे दिसते. पालकांना प्रवेशाचे एसएमएस (SMS) पाठविण्याच्या पहिल्या दिवसापासूनच संकेतस्थळ (Website) बंद असल्याने नेमका प्रवेश कुठे मिळाला, याबाबत पालकांना माहिती मिळत नाही. शिक्षण विभागाच्या (Education Department) वेळ खाऊपणामुळे RTE च्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडणार असल्याचे चित्र आहे.

राज्यात ५ एप्रिल रोजी RTE ची लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर पालकांना १२ तारखेपासून एमएमएस मिळतील, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मागील दोन दिवसांपासून आरटीई प्रवेशाचे  सर्व्हर अजूनही बंदच आहे आणि शाळाच्या पोर्टलवरही प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी अजून पाठवण्यात आलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जाता येईल याची शक्यता धूसर असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : गतिमान सरकारचे आरटीई संकेतस्थळ 'फेल'; शिक्षणमंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी

या संदर्भात 'एज्युवार्ता'च्या प्रतिनिधीशी बोलताना प्रगती स्कुलचे प्रमुख किशोर माने म्हणाले," ५ एप्रिल ला RTE ची सोडत निघाली, संबंधित पालकांना तसे मेसेज ही गेले पण त्या पुढची अपेक्षित प्रक्रिया ठप्प झाली आहे. स्कुल पोर्टलवर अजून आमच्या शाळेत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादीच आलेली नाही. सध्याच्या घडीला शिक्षण मंडळाचे सर्व्हर बंदच आहे. प्रत्येकवर्षी अशी समस्या येते. सुरुवातीचे दोन-तीन दिवस तर सर्व्हर बंदच असतो. पण या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कसलेही प्रयत्न होताना दिसत नाही. यावर्षी तर जवळ जवळ दीड लाख विद्यार्थ्यांची यादी लागणार आहे, त्यामुळे आणखीन गोंधळ वाढू शकतो."

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

या संपूर्ण प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करताना माने म्हणाले, "प्रशासनाने RTE ची सोडत लवकर घ्यायला हवी होती. सोडत निघून सुद्धा पालकांना पुढे मेसेज जायला १०-१२ दिवस लागले. त्यानंतर निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी, सर्व कागदपत्रांची पडताळणी, वेटिंग लिस्ट या संपूर्ण प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी लागेल. पण अजून शाळांकडे विद्यार्थ्यांची यादीच आलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मुलांना वर्गात यायला अजून कालावधी लागू शकेल. RTE चे विद्यार्थी  १२ जूनला  इतर विद्यार्थ्यांसोबत  शाळेत येऊ शकतील याची शक्यता कमीच आहे. पण या सर्व दिरंगाईचा बोजा आमच्या शिक्षकांवर पडतो. कारण RTE चे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात येईपर्यंत अभ्यासक्रम पुढे गेलेला असतो. शिक्षकांना  RTE च्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीचा वेळ देऊन त्यांच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा लागतो."