राजपथावर संचलनाचे राज्यातील १२ मुलींचे स्वप्न साकार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ३ मुली

त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन विद्यार्थीनींचा समावेश असून या विद्यार्थीनींचे राजपथावर संचलन करण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

राजपथावर संचलनाचे राज्यातील १२ मुलींचे स्वप्न साकार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ३ मुली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

(Rajpath ) राजपथावर  वीर जवानांना मानवंदना... सैन्य दलातील जवानांची शिस्तबद्ध परेड...राष्ट्रपती, पंतप्रधान यांना सलामी.. देशभक्तीपर गीतांनी आणि राष्ट्रप्रेमाने भारावून गेलेले उत्साही आणि जल्लोष करणारे नागरिक अशा वातावरणात महाराष्ट्रातील एनएसएसच्या 12 विद्यार्थीनींना ७५ व्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day)संचलन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) तीन विद्यार्थीनींचा समावेश आहे.त्यामुळे या विद्यार्थीनींचे राजपथावर संचलन करण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

हेही वाचा : प्राध्यापक भरतीतील आरक्षणासाठी दिव्यांग उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न

 दिल्लीतील राजपथावर संचलन  करून सलामी द्यावी,अशी प्रत्येक एनएसएसच्या विद्यार्थ्यांची इच्छा असते. मात्र, यंदा येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर संचलनाची संधी केवळ मुलींनाच देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून पुणे विद्यापीठाच्या अक्षदा देशपांडे, समीक्षा साळवे, आणि भूमिका गुप्ता या तीन विद्यार्थीनींना ही संधी मिळाली आहे.तसेच इतर विद्यापीठातील भाग्यश्री गेनवार, गायत्री पाटील, रश्मी तिवारी, स्नेहा जाधव , ब्युटी सिंग, काशिका यादव, रुची दैगव्हाने ,संस्कृती पेटकर , रिया परदेशी आशा एकूण १२ मुलींची संचलनासाठी निवड करण्यात आली आहे.कर्तव्यपथावर होणाऱ्या परेडसाठी एनएसएसचे सर्व विद्यार्थी उत्सुक आहेत.

महाराष्ट्रातून निवड झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थीनींमध्ये समिक्षा साळवे ही आळंदी येथील एमआयटी कॉलेजची विद्यार्थीनी आहे. तर अक्षदा देशपांडे ही नाशिक येथील एमव्हीपी लॉ कॉलेजची असून भूमिका गुप्ता ही ताथवडे येथील जेएसपीएम राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनियरिंगची विद्यार्थीनी आहे. या विद्यार्थीनींना राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.सदानंद भोसले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, संरक्षण मंत्रलय, सांस्कृतिक मंत्रालय तसेच शिक्षण मंत्रालयासह इतर मंत्रालयांच्या वरिष्ठ प्रतिनिधींच्या उपस्थितीत २०२४ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या प्रदर्शनामध्ये महिलांचा सहभाग अधिक असेल, असा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार कर्तव्यपथावर होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये महिलांचा समावेश वाढण्याच्या दृष्टीकोनातून यंदा एनएसएससाठी केवळ मुलींची निवड करण्यात आली आहे.त्यामुळे ७५ व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर नारी शक्तीचा जागर पाहायला मिळणार आहे.
--------------------------------------------------------

"प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडसाठी माझी निवड झाली, याचा मला मनापासून आनंद आहे. तसेच जबाबदारीची जाणीव देखील होत आहे. कारण मी माझे महाविद्यालय, विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्याचं  प्रतिनिधित्व करणार आहे.पुढेही महाराष्ट्राच नावं पुढे नेण्याचा आणि देशकार्यात सहभागी होण्याचा मी नेहमीच प्रयत्न करणार आहे."

- अक्षदा देशपांडे - विद्यार्थी 

------------------------------------------

"प्रजासत्ताक दिनासाठी राजपथावर परेड करण्यासाठी निवड झाल्याने मला खूप आनंद झाला आहे.माझ्या आयुष्यतील एक मोठी कामगिरी म्हणून मी याकडे पाहते.इथपर्यंत पोहचण्यासाठी आई-वडिलांनी आणि महाविद्यालयाने नेहमीच सहकार्य केले."

- समीक्षा साळवे, विद्यार्थी