वन विभाग भरती घोटाळा : उत्तरांसाठी दहा लाख, प्रश्नपत्रिकेचे १११ फोटो, करिअर अकादमीचाच हात

वन विभागात विविध संवर्गातील २ हजार ४१७ पदांसाठी भरती सुरू आहे. त्यामध्ये २ हजार १३८ एवढी पदे  वनरक्षकांची आहेत.

वन विभाग भरती घोटाळा : उत्तरांसाठी दहा लाख, प्रश्नपत्रिकेचे १११ फोटो, करिअर अकादमीचाच हात
Forest Department Recruitmnet

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील विविध भरती परीक्षांमध्ये (Recruitment Examination) मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामध्ये आता वन विभागाच्या भरती परीक्षेची (Forest Department) भर पडली आहे. या परीक्षेत एक करिअर अकादमीच (Career Academy) उमेदवारांना उत्तरे पुरवत असल्याचे समोर आले आहे. एकाकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांना मोबाईलवरून उत्तर पुरवली जात असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) एकाला अटक केली असून अकादमी चालकासह त्यांचे साथीदार फरार झाले आहेत.

वन विभागात विविध संवर्गातील २ हजार ४१७ पदांसाठी भरती सुरू आहे. त्यामध्ये २ हजार १३८ एवढी पदे  वनरक्षकांची आहेत. त्यासाठी वन विभागाकडून दि. ३१ जुलै ते ११ ऑगस्ट यादरम्यान ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेची जबाबदारी एका खासगी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. दि. ३१ जुलैला परीक्षेच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद पोलिसांनी गैरप्रकाराचा भांडाफोड केला. यामध्ये विनोद प्रतापसिंग डोभाळ (३२, रा. दरेगाव, औरंगाबाद) याला अटक करण्यात आली आहे. बजरंगनगरमधील शिवराणा करिअर अकादमीतूनच विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवली जात होत.

‘महाज्योती’ची परीक्षा वादात; खासगी क्लासचीच प्रश्नपत्रिका दिल्याचा आरोप, खुलासा मागवला

असा झाला पर्दाफाश

शिवराणा करिअर अकादमीवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांनी आधीच माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी अकादमीतील सर्वांनाच पकडण्याचा प्रयत्न केला. पण केवळ डोभाळ हाती लागला. उत्तरांसाठी प्रत्येक उमेदवाराकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांना मोबाइलद्वारे उत्तरे सांगितली जात होती. संपूर्ण टोळीच त्यासाठी कार्य़रत होती. सचिन गोमलाडू हा या टोळीचा सुत्रधार असून शिवराणा करिअर अकादमीचा संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागपूरहून स्पाय कॅमेऱ्याद्वारे प्रश्नपत्रिका टोळीकडे आली होती.

पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यातील एका मोबाइलवरील व्हॉट्सअॅपवर ४.४७ ते ५.३० या वेळेत प्रश्नपत्रिकेचे १११ फोटो आले होते. त्यातील ११० फोटोंमध्ये वनरक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे पाठविली असल्याची कबुली डोभाळने दिली आहे. ज्या परीक्षार्थीला ही उत्तरे सांगितली त्याचा बैठक क्रमांकही पोलिसांना मिळाला आहे. डोभाळ हा रेकॉर्डवरील आरोपी असून वेगवेगळ्या भरती परीक्षेत पेपर फोडण्यापासून ते हायटेक कॉपी करण्यापर्यंतच्या काही रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD