विद्यार्थ्यांना हॉल तिकिट दिले, पण विद्यापीठ परीक्षा घ्यायलाच विसरले

ही अजब घटना मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील दुर्गावती विद्यापीठात घडली आहे. 

विद्यार्थ्यांना हॉल तिकिट दिले, पण  विद्यापीठ परीक्षा घ्यायलाच विसरले

एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क

परीक्षेच्या तारखा विसरणे.. , एका विषयाच्या पेपरला दुसऱ्याच विषयाची तयारी करून जाणे.. ,अशा चुका विद्यार्थ्यांकडून घडत असतात. मात्र, विद्यार्थ्यांना हाॅल तिकीट (Hall ticket) प्रसिद्ध करुन जर चक्क विद्यापीठच परीक्षा घेण्याचे विसरले (The university itself forgot to take the exam) असेल तर, याला काय म्हणता येईल. ही अजब घटना मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील दुर्गावती विद्यापीठात (Durgavati University) घडली आहे. 

राणी दुर्गावती विद्यापीठाने एमएससी कॉम्प्युटर सायन्सच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक 20 दिवसांपूर्वी जाहीर केले. मंगळवार  5 मार्च पासून होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देखील देण्यात आले होते. पण जेव्हा  विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षा देण्यासाठी आले असता त्यांना परीक्षा नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे विद्यापीठाने प्रश्नपत्रिका देखील तयार केल्या नसल्याचे उघड झाले.

विद्यापीठाच्या या दुर्लक्षाबाबत विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे कार्यकर्ते डोळ्यावर काळी पट्टी बांधून कुलगुरूंची भेट घेण्यासाठी गेले असता यावेळी कुलगुरू सर्व विभागप्रमुख आणि कुलसचिवांसोबत बैठक घेतली.

यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना सांगितले की, "या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. परीक्षा रद्द करण्यात आल्याचे परीक्षा नियंत्रकांनी सांगितले होते, मात्र परीक्षा रद्द झाल्याची कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नाही. तपास अहवालानंतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल."