शिक्षक भरती अपडेट :निवडणूक आयोगाकडून भरतीसाठी शिथिलता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न 

भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात असताना अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे, चुकीची माहिती पसरवणे व आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे, ही गंभीर बाब आहे.

शिक्षक भरती अपडेट :निवडणूक आयोगाकडून भरतीसाठी शिथिलता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शिक्षण विभागातर्फे (Department of Education)राबवल्या जात असलेल्या शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment)समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रुपांतरीत करून भरण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहितेमधून (Code of Conduct)यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागा संदर्भातील कार्यवाही करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission)शिथिलता मिळाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही केली जाईल, मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील भरतीसाठी शिथिलता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत,असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare)यांनी स्पष्ट केले आहे.

शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे.मात्र निवडणूक आचार संहितेत भरती अडकली आहे.याबाबत शिक्षण विभागातर्फे बुलेटीन प्रसिध्द करण्यात आले आहे.त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेमधून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती.त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आली होती. दरम्यान विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक २४ मे रोजी निवडणूक आयोगाने घोषित केला.याच तारखेपासून या क्षेत्रासाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, असे आयोगाच्या प्रेस नोट मध्येच स्पष्टपणे  नमूद करण्यात आले आहे.

समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे.त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे.मात्र,काही मंडळी अभियोग्यताधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहेत. हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात असताना अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे, चुकीची माहिती पसरवणे व आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे, ही गंभीर बाब आहे.परंतु,ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.