MPSC परीक्षांच्या तारखा लवकर घोषित करा; रोहित पवारांची मागणी

शासनाने लवकरात लवकर आरक्षणासहित सुधारित जाहिरात MPSC कडे पाठवावी आणि आयोगाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन पुढील तारखा लवकर घोषित कराव्यात.

MPSC परीक्षांच्या तारखा लवकर घोषित करा; रोहित पवारांची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शासनाने लवकरात लवकर आरक्षणासहित सुधारित जाहिरात MPSC कडे पाठवावी आणि आयोगाकडून विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन पुढील तारखा लवकर घोषित करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) यांच्याकडे आपल्या 'एक्स' या सोशल मीडिया अकाउंट द्वारे केली आहे. 

राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 रोजी होणारी होती . ती मराठा उमेदवारांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारखा 'यथावकाश' जाहीर करण्यात येतील असं MPSC आयोगाकडून घोषित करण्यात आले आहे. यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची चिंता वाढली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर राज्यातील लोकसेवा आयोगाच्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलून सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्यात. या संदर्भात MPSC कडे पाठपुरावा केला असता शासनाकडून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणासहित सुधारित जाहिरात आल्यानंतर तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मिळाली असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. 

आयोगाच्या या निर्णयामुळे  राज्य भरातील उमेदवार प्रचंड नैराश्यात गेले आहेत. कारण, विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी करण्यासाठी दरमहा आठ ते दहा हजार रुपये खर्च येत आहे. पुण्यासारख्या शहरात राहून लाखो उमेदवार परीक्षांची तयारी करतात. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे आयोगाने समजून घेवून लवकर परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.