'स्व’-रूपवर्धिनी : सुदृढ, सशक्त समाज निर्मितीचे ज्ञानपीठ

'स्व’-रूपवर्धिनी ('SWA'-Roopwardhinee) या संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना (Students) यशाचा मार्ग दाखवत त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आणि आजही अविरतपणे हे काम तितक्याच पवित्र भावनेने सुरू आहे.

'स्व’-रूपवर्धिनी : सुदृढ, सशक्त समाज निर्मितीचे ज्ञानपीठ
'SWA'-Roopwardhinee

वारसा ज्ञानदानाचा : लेखमाला - भाग १ 

र्थिक दृष्ट्या कमकुवत व गरीब नागरी वस्तीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी सुमारे ४३ वर्षांपासून काम करणाऱ्या 'स्व’-रूपवर्धिनी ('SWA'-Roopwardhinee) या संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना (Students) यशाचा मार्ग दाखवत त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आणि आजही अविरतपणे हे काम तितक्याच पवित्र भावनेने सुरू आहे. सुदृढ, सशक्त समाज निर्माण करण्यासाठी आधी चांगला माणूस घडणे गरजेचे आहे; या महत्वपूर्ण कामात 'स्व’-रूपवर्धिनीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला वाहून घेतले. त्याचे प्रतिबिंब वैद्यकीय (Medical), प्रशासन (Administration), पोलीस (Police), क्रीडा (Sports), शिक्षण (Education) अशा सर्व क्षेत्रात वर्धिनीच्या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीतून दिसून येते. संस्थेने केवळ विद्यार्थी घडवले नाहीत तर अनेक कुटुंबांना (Family) भक्कमपणे स्वतःच्या पायावर उभे केले, या 'ज्ञानपीठ' रुपी संस्थेच्या वाटचालीचा थक्क करणारा दैदिप्यमान प्रवास शब्दांत मांडणे खरंच अवघड आहे. संस्थेच्या वर्धापनदिनाच्या ('SWA'-Roopwardhinee Anniversary) निमित्ताने केलेला हा छोटासा प्रयत्न...

किशाभाऊ अर्थात कृष्णाजी पटवर्धन आणि राजाभाऊ लवळेकर या संवेदनशील शिक्षक-मुख्याध्यापकांनी सेवा निवृत्तीनंतर १३ मे १९७९ रोजी 'स्व’-रूपवर्धिनीची पायाभरणी केली. शिक्षण आणि दिशादर्शक मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ज्यांचे भवितव्य अंधारात जाऊ शकते, अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून काम करण्याचे ठरवले. कारण विद्यार्थी वाम मार्गाला लागल्याने केवळ त्याचेच नुकसान होत नाही तर त्याच्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचेही नुकसान होते, या उदात्त विचाराने सुरुवातीला १२ मुलांना घेऊन संस्थेच्या कार्य सुरू झाले.

राज्यात हजारो शाळा आहेत, त्यात आणखी एका शाळेची भर नको म्हणून शाळा चालवायची नाही, अशी किशाभाऊ यांची भूमिका होती. शिक्षणाचे तंत्र हे यंत्र होत चालले असून विद्यार्थी सुध्दा परीक्षार्थी होत चालले आहेत. जास्तीत जास्त गुण कसे मिळतील याकडेच बहुतांश शाळा व विद्यार्थ्यांकडून लक्ष दिले जाते. त्यात वैयक्तिक विद्यार्थ्यांशी संवाद, संपर्क या गोष्टी मागे पडल्या. परिणामी ज्ञानाधिष्टीत विद्यार्थी घडवण्याचा विचार बाजूला फेकला गेला. त्यामुळे जे शाळेत व्हायला हवे आणि जे होत नाही ते करण्यासाठी खऱ्या अर्थाने किशाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेची स्थापना केली.

सामाजिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती बेताची आहे; पण ज्यांच्यात विकास क्षमता आहे, अशा मुलांना निवडून संस्थेत सामावून घेण्यास सुरुवात केली. मैदानी व्यायाम आणि खेळ व दीड तास अभ्यास, अशा प्रकारची 'शाखा' सुरू झाली. तसेच शाखेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या घराशी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क ठेवला. त्यातून तो मुलगा कोणत्या वातावरणातून येतो, त्याची घराची परिस्थिती कशी आहे, हे तपासले गेले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या स्वभावाविषयी माहिती मिळाली. तो मुलगा खोडकर किंवा लाजरा का आहे हे समजू शकले आणि त्यातून संबंधित विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व घडवण्याचे काम सुरू झाले.                   

सुरुवातीला १२ विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन सुरू केलेल्या कामाचे स्वरूप आज व्यापक झाले आहे. सध्या पुण्यात विविध १६ ठिकाणी शाखा सुरू असून त्यात सुमारे ६५० विद्यार्थी मार्गदर्शन घेतात. गेल्या ४३ वर्षांपासून संस्थेचे काम सुरू असून आता कार्यकर्त्यांची दुसरी-तिसरी फळी निर्माण झाली आहे. संस्थेत इंग्रजी, गणित आणि शास्त्र या विषयाचे आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे.   

विद्यार्थ्यांच्या मनात स्पंदने निर्माण करणारे उपक्रम 

संस्थेत विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्याची गटकार्य, मुलाखती, विविध संस्थांना भेटी असे कार्यक्रम वर्षभर केले जातात. या उपक्रमामुळे प्रत्येक मुलाच्या मनात काही ना काही स्पंदने निर्माण होतात. त्यातून मुलं प्रश्न विचारू लागतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. त्यातील एक घटना सांगण्यासारखी आहे. एकदा इंडो फ्रान्स येथील एक गट दुभाषकाच्या सहाय्याने एकदा संस्थेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आला होता. त्यावेळी काही मुलांनी फ्रान्स ध्वज, तेथील सण असे साधे प्रश्न विचारले. पण एक मुलगा म्हणाला, "आम्ही इतिहासामध्ये असे वाचले आहे की फ्रान्सने जगाला स्वातंत्र्य, बंधुता आणि समता या तीन गोष्टींची देणगी दिली. आज आम्ही फ्रान्समध्ये आलो तर आम्हाला काय दिसेल?" हा प्रश्न ऐकताच त्या गटातील फ्रान्सच्या प्राध्यापिका दोन मिनिटे स्तब्ध उभ्या राहिल्या. गडगडाटी हसल्या आणि म्हणाल्या, "स्वातंत्र्य नको तेवढे दिसेल समता आणि बंधुता तपासावी लागेल."

मराठी भाषेसाठी काम सुरू  

संस्थेच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमधून मुलांना करिअर निवडीबद्दल योग्य मार्गदर्शन मिळते. केवळ गुणांच्या मागे धावणाऱ्या अलीकडच्या शिक्षण पद्धतीमुळे मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. आपली मराठी भाषा सुद्धा नीटपणे बोलता येत नाही. निबंध लेखन, पत्रलेखन करता येत नाही. त्यामुळेच संस्थेने भाषेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. मुलांना विविध उपक्रम देऊन त्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.   

खेळाडू घडवणारी संस्था                           

पूर्वी शाळांना मैदाने होती. पण आता लहानशा जागेत शाळा सुरू असल्याने मर्यादा येतात. पण ज्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात कौशल्य आहे, त्यांचे काय करायचे? असा प्रश्न निर्माण होतो.  त्यामुळे खेळात चांगल्या असलेल्या मुलांची निवड करून त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यास संस्थेच्या माध्यमातून सुरुवात झाली. त्यातून राज्य व विभाग स्तरावरील अनेक खेळाडू निर्माण झाले. संतोष घाडगे (Santosh Ghatage) हा विद्यार्थी क्रीडा शिबिरात सहभागी झाला. त्याने क्रीडा क्षेत्रातील करिअर विषयक मार्गदर्शन घेतले. पुढे तो मल्लखांबाचा विद्यापीठ स्तरावरील संघप्रमुख झाला. त्याने अनेक सुवर्णपदके प्राप्त केली. २०१६ मध्ये त्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. सध्या तो पोलीस खात्यात आहे.

भक्कमपणे उभे राहून संघर्ष करण्याची शिकवण

बदलत्या काळानुसार संस्थेने स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली. त्यातील संस्थेचा एक विद्यार्थी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झाला. संस्थेतून घडल्यामुळे त्याने अत्यंत प्रामाणिकपणे प्रशासनात आपली सेवा बजावली. कोल्हापूर येथे प्रशासकीय सेवेत असताना तेथील एका व्यक्तीने खूप सेल्स टॅक्स थकवला असल्याचे दिसून आले. संबंधित व्यक्तीचे राजकीय लागेबांधे असल्याने त्याला कोणीही हात लावत नव्हते. पण कोणत्याही प्रसंगी भक्कमपणे उभे राहून संघर्ष करण्याची शिकवण घेतलेल्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी टॅक्स थकवलेल्या व्यक्तीकडून रुपया ना रुपया वसूल केला. त्यावेळी तत्कालीन सेल्स टॅक्स आयुक्तांनी स्वतः त्याच्या कार्यालयात जाऊन त्याचा सत्कार केला. आज तो मोठ्या पदावर कार्यरत आहे.  

पारधी समाजाची सर्व मुले शाळेत आली 

संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा उपयोग पुढील काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात चांगले काम करण्यासाठी होत असल्याचे अनेक वेळा दिसून आले. संस्थेतील तेजश्री नावाची एक मुलगी इयत्ता बारावीत असताना पारधी समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी नागपूर येथे गेले होती. या समाजाचे प्रश्न त्यांच्या अडचणी इतर समाजाकडून त्यांना दिली जाणारी वागणूक याबाबत तिला माहिती मिळाली. पुढील काळात ही मुलगी महिला व बालकल्याण विभागात अधिकारी म्हणून रुजू झाली. त्यावेळी एका गावाबाहेर असणाऱ्या पारधी समाजातील एकही मुल शाळेत जात नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यावेळी संबंधित गावातील सरपंचांना तिने आठ दिवसात पारधी समाजाची सर्व मुले शाळेत आली पाहिजेत, अन्यथा तुमचे अनुदान कसे थांबवायचे हे मला माहित आहे, असे सांगितले. त्यानंतर गावात प्रवेश न दिल्या जाणाऱ्या पारधी समाजाच्या मुलांना शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली.

संस्थेला शाहू-फुले-आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

संस्थेतर्फे बालवाडीपासून प्रौढ शिक्षणापर्यंत उल्लेखनीय योगदान दिले जात आहे. त्यासाठी शासनाकडून एकही रुपया अनुदान घेतले जात नाही. सेवाभावी संस्था व दानशूर संस्था व व्यक्तींकडून मिळालेल्या निधीतूनच संस्थेची वाटचाल सुरू आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध नाही. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून फिरती प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. आरोग्य सहाय्यक अभ्यासक्रमाबरोबरच गरजू मुली व महिला यांच्यासाठी एक स्वतंत्र प्रशिक्षण संकुल सुरू करण्यात आले. संस्थेने समाजातील सर्व दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. या कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संस्थेला शाहू-फुले-आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. १३ मे १९७९ रोजी संस्थेच्या कामाला सुरूवात झाली. नुकताच संस्थेने आपला वर्धापनदिन साजरा केला. त्यानिमित्ताने केलेला लहानसा प्रपंच...

शिरीष पटवर्धन, उपाध्यक्ष 'स्व’-रूपवर्धिनी

(शब्दांकन : राहुल शिंदे )