संच मान्यतेचे काय होणार? प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची पडताळणी करा!

अनेक सततच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शाळांना शंभर टक्के टार्गेट पुर्ण करता आलेले नाही. आधार अपडेशनवरच शिक्षक मान्यता अवलंबून असल्याने आता शाळांचे धाबे दणाणले आहे.

संच मान्यतेचे काय होणार? प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन  विद्यार्थ्यांची पडताळणी करा!
Aadhar Updation

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या आधार वैधतेचे (Aadhaar Updation) शाळांकडून केले जात आहे. अनेक सततच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शाळांना (Schools) शंभर टक्के टार्गेट पुर्ण करता आलेले नाही. आधार अपडेशनवरच शिक्षक (Teachers) मान्यता अवलंबून असल्याने आता शाळांचे धाबे दणाणले आहे. पण केवळ पाच-दहा विद्यार्थ्यांचे अपडेशन राहिले असेल तर त्याचा भुर्दंड संबंधित शाळेतील शिक्षकांना नको, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे याबाबतीच शालेय शिक्षण विभाग (School Education department) काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोविड-१९ (Covid 19) च्या पार्श्वभुमीवर २०१९-२० पासून शाळांच्या संच मान्यता जैसे थे ठेवण्यात आलेल्या होत्या. आता कोविड-१९ नंतर झालेले विद्यार्थ्याचे स्थलांतर परिस्थितीतील बदल इत्यादी बाबी विचारात घेवून शासनाकडून प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थी संख्या निश्चित करण्यासाठी "आधार" वैध विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार आहे. सद्यस्थितीत आधार वैधतेची कामे पुर्ण झालेली नाही. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेल्या संच मान्यता १५ मे पर्यंत अंतिम करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.

हेही वाचा : शैक्षणिक संस्थांकडून लूट; मुलाखतीसाठी गेलेल्या भावी प्राध्यापकांकडून ५०० ते ७०० रुपयांची वसुली

शिक्षण विभागाकडून आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत पोर्टलवर आधारची नोंद नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३ लाख ९२ हजार एवढी होती. तर UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर अवैध आढळून आलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा जवळपास वीस लाख एवढा आहे. त्यामुळे अजूनही लाखो विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही. अनेक शाळांना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करता आलेले नाही. त्यामुळे या शाळांच्या डोक्यावर आता संच मान्यतेत शिक्षक अतिरिक्त ठरण्याची किंवा कमी होण्याची टांगती तलवार राहणार आहे.

याविषयी एज्युवार्ता’शी बोलताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले (Mahendra Ganpule) म्हणाले, अनेक तांत्रिक अडचणींमुळे आधार अपडेशन करता आलेले नाही. दोष दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. पण त्यात यश आले नाही. त्यामुळे अनेक शाळांचे काम शंभर टक्के पूर्ण झालेले नाही. त्याचा परिणाम संचमान्यतेवर होऊ शकतो. त्यामुळे आधार अपडेशन अभावी शिक्षक अतिरिक्त ठरविणे किंवा कमी करणे चुकीचे ठरेल.

विद्यार्थी संख्येनुसार ज्यांची पदमंजुरी रीतसर होत असेल, तिथे काहीच अडचण नाही. पण पाच-दहा विद्यार्थ्यांचे आधार अपडेट नसल्यास शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे किंवा कमी करणे चुकीचे होईल. त्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची पडताळणी करावी. विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून मान्यता द्यावी, अशी मागणी आम्ही शिक्षण विभागाकडे करणार असल्याची माहिती गणपुले यांनी दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रमाणात शिक्षक मिळायला हवेत. अन्यथा त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असेही गणपुले यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; पाचव्यांदा देता येणार परीक्षा 

शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार -

शाळेकडील चालू शैक्षणिक वर्षामध्ये शिकत असलेले एकूण विद्यार्थी – २,१३,८१,९८२

Student Portal मध्ये आधारची नोंद नसलेले विद्यार्थी – ३,९२,३८२

Student Portal मध्ये आधारची नोंद असलेले विद्यार्थी – २,०९,८९,६००

UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेले विद्यार्थी – १,९६,४५,९४८

UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर वैध आढळून आलेले विद्यार्थी – १,७६,६४,६४४

UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर अवैध आढळून आले विद्यार्थी – १९,८१,३०४ 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2