विद्यार्थ्यांनी झेंडे हातात घेण्यापेक्षा समाजसुधारकांचे गुण घ्यावे : डॉ. अरुण अडसूळ यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. 

विद्यार्थ्यांनी झेंडे हातात घेण्यापेक्षा समाजसुधारकांचे गुण घ्यावे : डॉ. अरुण अडसूळ यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कुठलेही काम करताना परिस्थितीचे कारण देऊ नका, त्याचा बाऊ करु नका. तुम्ही सुरूवात केल्यावर समाज तुम्हाला मार्ग सुचवितो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे (SPPU) माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ (Dr. Arun Adsool) यांनी केले. तसेच कार्यकर्ता असलेल्या विद्यार्थांनी झेंडे हातात घेण्यापेक्षा महान समाजसुधारकांचे गुण घ्यावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. यावेळी व्यासपीठावर प्र -कुलगुरु डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक डॉ. मनोहर जाधव उपस्थित होते.

NSS Awards : राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये मुंबई विद्यापीठाचा दबदबा; कुणाची उल्लेखनीय कामगिरी? संपूर्ण यादी पाहा...

 

सध्या देशात सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात सुधारणेची गरज आहे. त्यामुळे समाजातील आर्थिक आणि सामजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांची साथ देऊन तुम्ही या सुधारणेचे पाईक व्हा, असेही डॉ. अरुण अडसूळ यावेळी  म्हणाले. तसेच कार्यकर्ता असलेल्या विद्यार्थांनी झेंडे हातात घेण्यापेक्षा महान समाजसुधारकांचे गुण घ्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

 

प्रत्येक विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करून क्षमता विकास करावा. तसेच आयुष्याचे ध्येय नीट समजावून घेऊन त्या दिशेने वाटचाल करायला सुरूवात करावी, असे मत प्र -कुलगुरु डॉ.पराग काळकर यांनी व्यक्त केले. सामाजिक परिवर्तनासाठी विद्यार्थी चळवळ सक्रिय राहणे आवश्यक असल्याचे मत प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी यावेळी मांडले.

 

कार्यक्रमात विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुळकर्णी, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदेश जाडकर, डॉ, सदानंद भोसले, डॉ. संजय ढोले, डॉ. दिपक पाटील, डॉ. महेंद्र मोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. मनोहर जाधव यांनी तर सूत्रसंचालन सिद्धार्थ लाडे यांनी केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO