PRN BLOCK : सत्र पूर्ततेची संधी २०१३-१४ मध्ये अंतिम वर्षात आलेल्या विद्यार्थ्यांना ; पण विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

२०१३-१४ या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात आलेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ दिला जाणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

PRN BLOCK : सत्र पूर्ततेची संधी २०१३-१४ मध्ये अंतिम वर्षात आलेल्या विद्यार्थ्यांना ; पण विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी (Two exam opportunities) देण्याचा निर्णय घेतला असला तरी नेमक्या कोणत्या वर्षापासून पुढील विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळेल, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. मात्र, २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात आलेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ दिला जाणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून (From Senior Officers of Examination Department) सांगितले जात आहे. परंतु, विद्यापीठाने याबाबत अधिक स्पष्टता आणणारे परिपत्रक प्रसिद्ध करावे, अशी मागणी विद्यार्थी व प्राचार्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा : शिक्षण SPPU News : विद्यापीठ करणार शेती; कमवा व शिका योजेतून सेंद्रीय शेतीला देणार चालना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्न पुणे,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 88 हजार विद्यार्थ्यांना दोन परीक्षेच्या संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सत्र पूर्तता न झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना पदवी मिळणे शक्य होणार आहे. मात्र, या परीक्षेच्या संधी नेमक्या कोणत्या वर्षापासून पुढील विद्यार्थ्यांना मिळणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये कोणत्याही शैक्षणिक वर्षाचा उल्लेख नाही. तसेच महाविद्यालयांना सुद्धा लेखी स्वरूपातील स्पष्ट माहिती विद्यापीठाने कळवलेली नाही. त्यामुळे जो तो आपापल्या परीने या परिपत्रकाचा अर्थ लावत आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळणार आहे. मात्र,कोणताही विद्यार्थी थेट अंतिम वर्षात येत नाही. त्यामुळे २०१०-११ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन २०१२-१३ मध्ये द्वितीय वर्षात आणि २०१३-१४ मध्ये अंतिम वर्षात पोहोचलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध असेल, असे परीक्षा विभागातील अधिकारी सांगत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

दरम्यान, विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रचलित अनुषंगिक अध्यादेश, विविध केंद्रीय व राज्यस्तरीय प्राधिकरणाचे निकष, परीक्षा विषयक व अभ्यासक्रम विषयक मार्गदर्शक तत्वे व अटी या सर्वांबाबतची खातरजमा करून संबंधित विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज अभिप्रायासह विद्यापीठाकडे सादर करावा, असे नमूद केले आहे. मात्र, विद्यापीठानेच या संदर्भात स्पष्टता दिली तर गोंधळ उडणार नाही. केवळ वर्षच नाही तर विद्याशाखा निहाय स्पष्टपणे समजेल, अशा स्वरूपात माहिती द्यायला हवी, अशी अपेक्षा प्राचार्यांनी व्यक्त केली.