मराठी भाषा विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने याबाबतचा अहवाल सोमवारी पाटील यांना सादर केला.

मराठी भाषा विद्यापीठ येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

रिद्धपूर (जि. अमरावती) येथील प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठासाठी (Marathi Language University) विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर केले जाणार आहे. त्यानंतर पुढील वर्षीच्या जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher Education Minister Chandrakant Patil) यांनी सांगितले.

 

विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने याबाबतचा अहवाल सोमवारी पाटील यांना सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सदस्य प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. अविनाश आवलगावकर, कारंजेकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर आदी उपस्थित होते.

NSS Awards : राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये मुंबई विद्यापीठाचा दबदबा; कुणाची उल्लेखनीय कामगिरी? संपूर्ण यादी पाहा...

 

मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. या मागणीचे महत्व लक्षात घेऊन शासनाने समितीचे गठन केले होते. समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल पूर्ण केला आहे. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. तसेच या मसुदा समितीचे रूपांतर मराठी भाषा विद्यापीठाच्या सल्लागार समितीत करावे, असे पाटील यांनी सांगितले.

 

मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समितीचे यापुढेही सहकार्य राहील. विद्यापीठाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम होतील याचाही विचार करण्यात आला आहे. पारंपरिक विद्यापीठांपेक्षा मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा वेगळेपण केंद्रस्थानी ठेऊन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO