PWD JE TCS paper leak : आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेचा पेपर फुटला ?

MPSC, Junior Engineer exam, Latur, Maharashtra, Competitive Exam, Latur

PWD JE TCS paper leak : आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेचा पेपर फुटला ?
MPSC News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Junior Engineer exam :
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (स्थापत्य) शनिवारी झालेल्या कनिष्ठ अभियंता(JE) साठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये पेपर फुटीचा आणखी एक प्रकार घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. लातूर (Latur) येथील परीक्षा केंद्रावरील यंत्रणेतर्फे प्रश्नपत्रिका आणि त्यावर उत्तर पुरविल्या गेल्याचा भीषण प्रकार घडला असल्याचे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral video) म्हटले आहे, तसते या घटनेची चौकशी करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.

नागपूर येथील जिंदाल केंद्रावर सुद्धा काही विद्यार्थ्यांना केंद्रावरील यंत्रणेमार्फत मदत केली गेली असावी, अशी सुद्धा शंका विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाकडून रिक्त पदांची भरती लवकर केली जात नाही. जी भरती केली जाते ती  खासगी संस्थांमार्फत होत आहे. त्यात पारदर्शकता नसून सर्वत्र सावळा गोंधळ सुरू असल्याचे लातूर येथे घडलेल्या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले असल्याचे युवक काँग्रेसने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, या संदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.  ''सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध पदांसाठी १३ डिसेंबर २०२३ ते २८ डिसेंबर २०२३ पर्यंत राज्यभरात परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र, लातूर येथील Coss कॉम्पुटर इन्स्टिट्युट परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे. सदर परीक्षा TCS ION या संस्थेमार्फत घेण्यात येत आहेत. TCS ION परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षक उमेदवारांना उत्तरे पुरवीत असल्याचे तलाठी भरतीत समोर आले होते.''असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे ४३ वे अधिवेशन नांदेडला

''अधिकृत TCS ION परीक्षा केंद्राबरोबरच TCS कंपनीने Coss कॉम्पुटर इन्स्टिट्युट सारख्या अनेक खासगी परीक्षा केंद्रांना परीक्षा घेण्यासाठी नियुक्त केले आहे. खासगी परीक्षा केंद्र चालक हे उमेदवारांना मदत करत असल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे, या खासगी परीक्षा केंद्रांवर नियुक्त केले जाणारे पर्यवेक्षक कधी-कधी दिवसाच्या रोजंदारीवर नियुक्त केले जातात. असे लातूर येथील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उमेदवार परीक्षा केंद्रात झालेल्या गैरप्रकाराबद्दल सांगत आहेत.'' 

''पेपर सोडवत असताना, उमेदवारांना कच्च्या कामासाठी रफ पेपर दिला जातो, त्या रफ पेपरवर एका विशेष उमेदवाराला उत्तरे पुरविण्यात आल्याचा आरोप इतर उमेदवारांनी केला आहे. उमेदवारांनी सदर घटनेबद्दल तक्रार केल्यानंतर, आरोपी उमेदवाराने चक्कर आल्याचे नाटक केले आणि त्यानंतर परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सदर उत्तर असलेली रफ शीट गायब  केली.'' या सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

''उमेदवारांकडे उत्तरे असणारा रफ पेपर बाहेरून पुरविण्यात आला, याचा अर्थ परीक्षेची प्रश्नपत्रिका त्याच अथवा इतर परीक्षा केंद्रावरून फोडली असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नक्की अशा किती परीक्षा केंद्रावर याप्रकारे पेपर फोडण्यात येत आहेत,  याबद्दल सखोल तपास गरजेचा आहे, म्हणून सर्वप्रथम आपण या परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही हस्तगत करून तपासाअंती गैरप्रकार झाला असल्याचे स्पष्ट झाल्यास सदर परीक्षा केंद्राच्या मालकावर आणि कर्मचाऱ्यांवर FIR दाखल करावा,'' अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.  

हेही वाचा : DPIIT परीक्षक भरती परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध

'' याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रार देण्यास टाळाटाळ केल्यास स्पर्धा परीक्षा समन्वय समिती पोलीस विभागाला सहकार्य करेल. तसेच याबाबत   आम्ही आमच्या स्तरावर तक्रार देण्यास तयार आहोत. इतर कोण-कोणत्या जिल्ह्यात असे गैरप्रकार घडले आहेत, याचा छडा लावण्यात यावा, सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. सिव्हिल अभियांत्रिकी उमेदवार अनेक वर्षांपासून या जाहिरातीची वाट बघत होते. मात्र, परीक्षेत घडणारे गैरप्रकार त्यांना नैराश्यात ढकलत आहेत.  त्यामुळे या गैरप्रकारात सामील असणाऱ्या सर्व आरोपींचा छडा लावून सखोल तपास करण्यात यावा. तसेच  दोषी आढळल्यास संबंधितांवर  गुन्हे दाखल करावेत'' अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.

--------------

लातूर येथे घडलेल्या पेपर फुटी सारखा प्रकार यापूर्वी इतर परीक्षेच्यावेळी काही केंद्रांवर झाला होता. त्यामुळे उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे.त्यानंतरच संबंधित उमेदवाराला नियुक्ती द्यावी.तसेच लातूर येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करावी.

-राहुल कवठेकर , स्पर्धा परीक्षा समन्वय समिती