पोलीस भरतीत नियमांचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय!

सध्या महाराष्ट्र राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रिया सुरु आहे. मुंबई वगळता जवळपास सर्व जिल्ह्यांची मैदानी आणि लेखी परीक्षा पार पडल्या आहेत.

पोलीस भरतीत नियमांचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय!
Police Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यांत सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या (Police Recruitment) प्रक्रियेत नियमांचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने (AAP) केला आहे. एकाच घटकात एकाच पदासाठी एकच अर्ज करणे अपेक्षित असताना लाखो विद्यार्थ्यांनी (Students) एकापेक्षा जास्त अर्ज भरले आहेत. त्यांचे अर्ज बाद न झाल्याने नियमाप्रमाणे एकच अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असल्याचा दावा ‘आप’कडून केला जात आहे. (Police Recruitment Latest News)

आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्र राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रिया सुरु आहे. मुंबई वगळता जवळपास सर्व जिल्ह्यांची मैदानी आणि लेखी परीक्षा पार पडल्या आहेत. सुरुवातीपासून या पदभरतीमध्ये अनियमितता सुरु असून त्या बाबी अनेक लोकांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास देखील आणून दिल्या आहेत.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

शासनाच्या नियमाप्रमाणे अर्जदारास पोलीस शिपाई, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण ३ पदांसाठी एकाच घटकात किंवा ३ वेगवेगळ्या घटकात अर्ज आदर करता येतो. पण एकाच घटकात एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करता येणार नाही, अशी अट होती. प्रत्यक्षात ही अट डावलून विविध जिल्ह्यात एकाच पदांसाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याचे पत्रात म्हटले आहे.

लाखो अर्ज असताना एकापेक्षा जास्तवेळा भरलेले अर्ज बाद न करता तशाच लेखी परीक्षा घेण्यात आल्या. मैदानी चाचणीच्या तारखा वेगवेगळ्या असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या जिल्ह्यात मैदानी चाचणी देणे शक्य झाले. ज्याचा परिणाम मैदानी चाचणीचे मेरिट वाढले आणि नियमाप्रमाणे अर्ज भरणारे विद्यार्थी लेखी परीक्षेस अपात्र ठरल्याचे कुंभार यांनी पत्रात नमूद केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन केले त्यांच्यावर अन्याय झाला व ज्यांनी भरती नियम मोडले त्यांना मात्र बक्षिसी मिळाली. हा नियमाप्रमाणे वागणा-या उमेदवारांवर अन्याय आहे. वास्तविक लेखी परीक्षेपूर्वी असे अर्ज बाद करून मेरिट लावणे अपेक्षित होते. तसे न करता सरसकट लेखी परीक्षा घेण्यात आल्या. ज्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. अशा असंख्य विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी कुंभार यांनी केली आहे.