'इनोव्हेशन हब' निर्मितीच्या दिशेने शासनाचे पहिले पाऊल ; कार्यबल गट स्थापन

या कार्यबल गटामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर आगाशे , पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन इनक्युबेशन आणि एंटरप्राईजचे संचालक डॉ.संजय ढोले , जळगाव विद्यापीठाच्या इंक्युबॅशन सेंटरचे डॉ.राजेश जोगळेकर, सीओईपी इंक्युबॅशन सेंटर डॉ. एन. बी. ढोके यांचा समावेश करण्यात आला आहे. 

'इनोव्हेशन हब' निर्मितीच्या दिशेने शासनाचे पहिले पाऊल ; कार्यबल गट स्थापन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील संशोधन (Research), नवोपक्रम क्रियेला चालना व योग्य दिशा मिळावी आणि 'इनोव्हेशन हब'  (innovation hub ) निर्माण व्हावे,  या उद्देशाने राज्य शासनाने पहिले महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून त्यासाठी उच्च शिक्षण विभागातर्फे (Department of Higher Education)  'महाराष्ट्र राज्य विश्वासार्ह संशोधन व नवोपक्रम कार्यबल गट ' (MSRRIT) स्थापन करण्यात आला आहे. त्या माध्यमातून राज्यातील सर्व विद्यापीठांमधील संशोधक प्राध्यापकांना एकाच व्यासपीठावर आणले जाणार आहे.तसेच औद्योगिक कंपन्यांना (industrial companies)बरोबर घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि रिन्यूएबल एनर्जी अॅण्ड ग्रीन टेक्नोलॉजी या क्षेत्रात संशोधन केले जाणार आहे.

राज्य शासनातर्फे स्थापना करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य विश्वासार्ह संशोधन व नवोपक्रम कार्यबल गटाला पुढील तीन महिन्यात राज्याच्या सार्वजनिक विद्यापीठांमधील संशोधनाच्या सद्यस्थितीचा अहवाल शासनास सादर करावा लागणार आहे. तसेच या गटाचा कार्यकाल एक वर्ष कालावधीसाठी असणारा आहे.या कार्यबल गटामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर आगाशे , पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन इनक्युबेशन आणि एंटरप्राईजचे संचालक डॉ.संजय ढोले , जळगाव विद्यापीठाच्या इंक्युबॅशन सेंटरचे डॉ.राजेश जोगळेकर, सीओईपी इंक्युबॅशन सेंटर डॉ. एन. बी. ढोके यांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : प्राध्यापकांकडे बनावट सेट-नेट प्रमाणपत्र; पडताळणीत धक्कादायक माहिती समोर, 'युजीसी'चे पत्र 

ढोके हे या कार्यबल गटाचे संयोजक असून हा कार्य बलगट सर्व शाखांमध्ये दर्जेदार संशोधन होण्यासाठी, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी , मार्गदर्शन,  प्रोत्साहन व क्षमता निर्माण करण्यासाठी आणि राज्य विद्यापीठांमध्ये व्यापक धोरण करून संशोधन कार्याला चालना देणारी सर्वोच्च संस्था म्हणून काम पाहणार आहे. हा गट राज्यातील संशोधन व नवोपक्रम कार्य यांचा प्रभावीपणे मागवा घेण्यासाठी एक यंत्रणा विकसित करेल. संशोधनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचार करेल आणि संशोधन करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य करण्यासाठी सर्वसमावेशक कार्यप्रणाली तयार करेल. 

या गटात तर्फे प्रायोगिक तत्त्वावर एक' रिसर्च अँड इनोवेशन हब ' ची स्थापना केली जाईल. या हब च्या स्थापनेची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कार्यबल गट राज्याच्या प्राधान्य क्षेत्रातील संशोधनाच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन करेल.  तसेच संशोधनाच्या एका उप विषयाची निवड करेल. या उप विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधकांची निवड सहभागी विद्यापीठातून करण्यात येईल. निवडलेल्या विषयाच्या तज्ज्ञानाची तसेच या विषयावर संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची माहिती एकत्रित करण्यात येईल. या गटाच्या माध्यमातून प्रमुख संशोधक विषयांचे तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांबरोबर चर्चा होण्यासाठी संभाव्य भागीदारांसोबत प्राथमिक बैठकांचे आयोजन करेल.

-------------------
" राज्य शासनातर्फे महाराष्ट्र राज्य विश्वासार्ह संशोधन व नवोपक्रम कार्यबल गट स्थापन करण्यात आला असून या गटाच्या माध्यमातून संशोधन व नवोपक्रम क्रियेला चालना दिली जाणार आहे.त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स,  मशीन लर्निंग आणि रिन्यूएबल एनर्जी अॅण्ड ग्रीन टेक्नोलॉजी हे क्षेत्रे निवडण्यात आली आहेत.या गटाच्या माध्यमातून सर्व संशोधकांना एका व्यासपीठावर आणले जाणार आहे.तसेच पुढील काळात औद्योगिक कंपन्यांशी सहकार्य करार केले जातील."   

- डॉ.संजय ढोले, सदस्य, राज्य विश्वासार्ह संशोधन व नवोपक्रम कार्यबल गट 
--------------------

कार्यबल गटाचे प्रमुख कार्ये खालील प्रमाणे : 
१) राज्याच्या सार्वजनिक विद्यापीठांमधील संशोधनाच्या व नवउपक्रमाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करणे. 
२) राज्यातील प्राधान्य संशोधन क्षेत्रे निश्चित करणे. 
३) अशा संशोधनांकरिता होत असलेल्या संशोधन प्रकल्पांचा मागोबा घेण्यासाठी एक यंत्रणा तयार करणे. 
४) संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन करणे. 
५) संशोधनासाठी उपलब्ध होणाऱ्या निधी संदर्भातील संधी ओळखून त्याची व्याप्ती वाढवणे.  तसेच अशा संधींना प्रतिसाद मिळण्यासाठी गट तयार करणे.
६) आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि उद्योगांचा सहभाग व सहकार्य वाढविण्यासाठी सर्वसमावेशक कार्यप्रणाली तयार करणे. 
७) प्रशिक्षण गटविकास प्रस्ताव तयार करणे,  व्यवस्थापन आणि शास्वतता या क्षेत्रातील मोठ्या पुढाकारांसाठी सामायिक प्रशासन सेवा व साधने प्रदान करणे.
८) संशोधनाची गुणवत्ता आणि प्रासंगिकता सुधारण्यासाठी त्या संदर्भातील सर्वोत्तम कार्यपद्धतीचे सामायिकीकरण करणे आणि प्रोत्साहन देणे.