अंगणवाडी सेविका, शिक्षकांना सहा किंवा बारा महिन्यांचा कोर्स करावा लागणार

नवीन शैक्षणिक धोरणामुळे मुलांच्या बाल्यावस्थेपासूनच लक्ष देण्यात आले आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. हे प्रशिक्षण कार्यक्रम DTH चैनल तसेच स्मार्टफोनद्वारे डिजिटल / दूरस्थ पद्धतीने चालवले जाऊ शकतात

अंगणवाडी सेविका, शिक्षकांना सहा किंवा बारा महिन्यांचा कोर्स करावा लागणार
Anganwadi News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) वय वर्ष तीन पासून प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षणाचा (ECCE) मजबूत पायादेखील समाविष्ट केला आहे. त्याअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये उच्च दर्जाचा शिक्षकवर्ग तयार करण्यासाठी NCERTने विकसित केलेल्या शैक्षणिक आराखड्यानुसार सध्याच्या अंगणवाडी सेविका / शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. १०+२ आणि त्यापेक्षा जास्त पात्रता असलेल्या सेविकांना ECCE मध्ये 6 महिन्यांचा प्रमाणपत्र कोर्स असेल. तर त्याहून कमी शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांना प्रारंभिक साक्षरता, संख्या आणि ECCE च्या इतर संबंधित पैलूंचा एक वर्षाचा पदविका कोर्स पुर्ण करावा लागणार आहे. (NEP 2020 News)

टप्प्याटप्प्याने देशभरात उच्च-गुणवत्तापूर्ण ECCE ची (अर्ली चाईल्डहूड केअर अँड एज्युकेशन : प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण) सार्वत्रिक उपलब्धता सुनिश्चित करणे हे व्यापक उद्दिष्ट असेल. प्रारंभिक बाल्यावस्था शैक्षणिक संस्थांचा लक्षणीयरित्या विस्तार आणि त्यांचे बळकटीकरण केलेल्या यंत्रणेद्वारे ECCE प्रदान केले जाईल, ज्यामध्ये (a) स्वतंत्र अंगणवाड्या (b) प्राथमिक शाळांसोबत असलेल्या अंगणवाड्या (c) विद्यमान प्राथमिक शाळांसोबत असलेल्या पूर्व प्राथमिक शाळा / विभाग ज्यामध्ये किमान ५-६ वर्षे हा वयोगट समाविष्ट असेल आणि (d) स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळा, यांचा समावेश असेल - या सर्वांमध्ये ECCEचा अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र यांचे विशेष प्रशिक्षण दिलेले कर्मचारी/शिक्षक भरती केले जातील.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

नवीन शैक्षणिक धोरणामुळे मुलांच्या बाल्यावस्थेपासूनच लक्ष देण्यात आले आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. हे प्रशिक्षण कार्यक्रम DTH चैनल तसेच स्मार्टफोनद्वारे डिजिटल / दूरस्थ पद्धतीने चालवले जाऊ शकतात, त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या सध्याच्या कामात कमीतकमी व्यत्यय येऊन ECCE पात्रता मिळवता येईल. अंगणवाडी सेविकांच्या / शिक्षकांच्या ECCE प्रशिक्षणास शालेय शिक्षण विभागाच्या क्लस्टर रिसोर्स सेंटरद्वारे मार्गदर्शन केले जाईल, जे सातत्याने मूल्यांकन करण्यासाठी महिन्यातून किमान एक संपर्क वर्ग घेतील. दीर्घ मुदतीमध्ये राज्य सरकार, विशिष्ट टप्प्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण, मार्गदर्शन यंत्रणा आणि करियर मॅपिंगद्वारे, ECCEसाठी व्यावसायिक पात्रता असलेल्या शिक्षकाची फळी तयार करेल. या शिक्षकांच्या सुरुवातीच्या व्यावसायिक पूर्वतयारीसाठी आणि त्यांच्या अविरत व्यावसायिक विकासासाठी (CPD) आवश्यक सुविधादेखील तयार केल्या जातील.

लहान मुलाच्या मेंदूच्या एकंदर विकासापैकी ८५ टक्केहून अधिक विकास वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत होतो. यावरून मेंदूचा निकोप विकास आणि बाद सुनिश्चित करण्यासाठी सुरवातीच्या काही वर्षांत मेंदूची योग्य काळजी घेतली जाण्याचे आणि उत्तेजनाचे निर्णायक महत्त्व लक्षात येते. सध्या कोट्यावधी लहान मुलांना, विशेषतः सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमी असलेल्या मुलांना दर्जेदार ECCE उपलब्ध नाही. ECCE मध्ये भरीव गुंतवणुकीमुळे सर्व लहान मुलांना ते उपलब्ध करून देणे शक्य आहे. त्यामुळे ही मुले आयुष्यभर शैक्षणिक व्यवस्थेत सहभाग घेण्यास आणि उत्कर्ष साधण्यास सक्षम बनतील. अशा रीतीने, गुणवत्तापूर्ण बाल्यावस्था पूर्व विकास, संगोपन, आणि शिक्षणाची सार्वत्रिक तरतूद शक्य तितक्या लवकर आणि २०३० च्या आत होणे आवश्यक आहे. म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करणारे सर्व विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी सज्ज झाले असतील, असे धोरणात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक आराखडा तयार

ECCE मध्ये प्राधान्याने लवचिक, बहुपैलू, बहुस्तरीय खेळांवर-आधारित, कृती-आधारित आणि जिज्ञासा- आधारित शिक्षणाचा समावेश असतो. NCERT ने आठ  वर्षांपर्यंतच्या मुलांच्या प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि शैक्षणिक आराखडा (NCPFECCE) दोन भागामध्ये तयार केला आहे. हे भाग म्हणजे ०-३ वर्षांच्या बालकांसाठीचा उप-आराखडा आणि ३-८ वर्षांच्या मुलांसाठीचा उप-आराखडा, आणि तो वरील मार्गदर्शक तत्त्वे, ECCEवरील नवीनतम संशोधन आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींशी अनुरूप आहे.

वय वर्ष ५ च्या अगोदर प्रत्येक मूल "पूर्वाध्ययन वर्ग (प्रिपरेटरी वर्ग) किंवा "बालवाडी" (म्हणजे इयत्ता पहिलीच्या आधी) येथे जाईल, ज्यात ECCE अर्हतापात्र शिक्षक असेल. पूर्वाध्ययन वर्गातील शिकणे हे प्रामुख्याने खेळांवर आधारित असेल, ज्यामध्ये आकलनात्मक, भावनात्मक आणि सायकोमोटर क्षमता आणि पूर्व साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. प्राथमिक शाळांमधील पूर्वाध्ययन वर्गांना माध्यान्ह भोजन कार्यक्रमदेखील लागू केला जाईल. अंगणवाडी व्यवस्थेत उपलब्ध असणारी आरोग्य तपासणी व वाढ यांची देखरेख अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील पूर्वाध्ययन वर्गांच्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध केली जाईल. आदिवासीबहुल भागांतील आश्रमशाळांमध्ये आणि टप्प्याटप्प्याने पर्यायी शिक्षणाच्या सर्व स्वरूपांमध्येदेखील ECCEची सुरुवात केली जाईल. आश्रमशाळांमध्ये आणि पर्यायी शिक्षणव्यवस्थेमध्ये ECCEची एकात्मीकरण आणि अंमलबजावणी प्रक्रिया असेल.