पुणे विद्यापीठात शिव्यांचा 'रॅप'

ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या आवारात व इमारतीमध्ये अनेक चित्रपटांचे व शॉर्ट फिल्मचे शूटिंग केले जाते.

पुणे विद्यापीठात शिव्यांचा 'रॅप'
Rap Song in SPPU

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

SPPU Rap Song Viral :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) सभागृहामध्ये व आवारामध्ये अत्यंत अश्लील शिव्या देऊन रॅप बनवण्यात आला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मात्र यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाने (NCP) आक्षेप घेतला असून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.तसेच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आणि ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून संबोधल्या जाणा-या पुणे विद्यापीठाच्या इमारतीत कोणत्याही प्रकारचे शूटिंग करण्यास परवानगी दिली जाणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. (Savitribai Phule Pune University News)                         

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/   

ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या आवारात व इमारतीमध्ये अनेक चित्रपटांचे व शॉर्ट फिल्मचे शूटिंग केले जाते. विद्यापीठ प्रशासनातर्फे त्यासाठी शुल्क आकारले जाते. परंतु, विद्यापीठाची इमारत किंवा परिसर भाडेतत्त्वावर देण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना झुंड चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विद्यापीठाचे मैदान देण्यात आले होते. त्यावरूनही बराच वादंग निर्माण झाला होता.

विद्यापीठाने निधी उभारण्यासाठी विद्यापीठाचा परिसर व इमारत भाडेतत्त्वावर द्यायला कोणतीही हरकत नाही. परंतु,अश्लील गोष्टींचे चित्रीकरण करण्यासाठी इमारत वापरण्यासाठी देणे योग्य नाही,असे मत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील (Akash Zambare Patil) यांनी व्यक्त केले. 

विद्यापीठाच्या सभागृहात चित्रित करण्यात आलेल्या रॅपमध्ये तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटली दिसत आहे. तसेच मुख्य इमारतीच्या आवारात फिरताना सुद्धा या रॅप सॉंग मध्ये अश्लील शिव्यांचा भडीमार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या इमारतीमध्ये व आवारामध्ये अशा प्रकारचे चित्रीकरण करण्यास परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आजी-माजी विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या लोकांची जाहीर माफी मागावी, अशीही मागणी आकाश झांबरे पाटील यांनी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारातील काही चित्रफिती अनधिकृतपणे वापरून काही व्यक्तींनी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमांमध्ये प्रसारित केल्याचे निदर्शनास आलेले आहे.  अशा प्रकारचे आक्षेपार्ह छायाचित्रण विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत व आवारात  विद्यापीठाची परवानगी न घेता करणे ही बाब आक्षेपार्ह व गंभीर स्वरूपाची आहे. विद्यापीठ अशा कृत्याचा तीव्र निषेध करीत आहे. याबाबत चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी कळविले आहे.