शाळांकडून सीबीएसईच्या नव्या पुस्तकांची सक्ती; पालक सैरभैर

विविध पाठ्यपुस्तकांमधील धडे वगळण्यात आले आहेत. त्यामध्ये इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून महात्मा गांधींच्या हत्येविषयीची माहिती काढून टाकण्यात आली आहे.

शाळांकडून सीबीएसईच्या नव्या पुस्तकांची सक्ती;  पालक सैरभैर
ABC Chowk Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) येत्या शैक्षणिक वर्षापासून काही विषयांच्या पाठ्यपुस्तकांमधून काही भाग वगळण्यात आला आहे. मात्र, अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यानंतर या मंडळाच्या काही शाळांकडून (CBSE Schools) विद्यार्थ्यांना नव्याने छपाई करण्यात आलेल्या पुस्तके आणण्याची सक्ती केली जात आहे. त्यातील काही पुस्तकांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. (CBSE Latest News)

कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळाले. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मानसिक ताण सहन करावा लागला. यापार्श्वभूमीवर सीबीएसईकडून काही विषयांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. विविध पाठ्यपुस्तकांमधील धडे वगळण्यात आले आहेत. त्यामध्ये इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून महात्मा गांधींच्या हत्येविषयीची माहिती काढून टाकण्यात आली आहे. अशाचप्रकारे बहुतेक पुस्तकांमधून धडे कमी करून अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

धडे कमी केले असले तरी नव्याने त्यामध्ये इतर माहिती समाविष्ट केलेली नाही. त्यामुळे जुन्या पुस्तकांवरून अध्यापन करता येऊ शकते. मात्र पुण्यातील काही शाळांकडून धडे वगळलेल्या नव्या पुस्तकांचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. हिंदी, संस्कृत यांसह आणखी काही पुस्तके बाजारात उपलब्ध होत नाहीत. पुण्यातील अप्पा बळवंत चौकातील पुस्तकांच्या दुकानांमध्ये पालकांकडून याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे.

हेही वाचा : बोगस शाळांवर शेवटचा हातोडा; शिक्षण आयुक्तांचे शाळा बंद करण्याचे आदेश

पुण्यातील सुवर्णा सुर्यवंशी यांचा मुलगा केंद्रीय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत आहे. त्यांना शाळेने नवीन पुस्तके आणण्यास सांगितली आहेत. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, शाळेकडून नव्या पॅटर्नच्या पुस्तकांचा आग्रह केला जात आहे. मी मुलासाठी जुन्या पॅटर्नची पुस्तके घेतली होती. पण शाळेने पुन्हा ती पुस्तके परत द्यायला सांगून नवीन पॅटर्नची पुस्तके आणण्यास सांगितले. अनेक पुस्तकांच्या दुकानात ही पुस्तके मिळाली नाहीत. दोन-तीन दिवस दुकानांमध्ये जावे लागले. त्यानंतर हिंदी आणि संस्कृतचे पुस्तक मिळाले नाही. त्यामुळे ती पुस्तके जुन्याच पॅटर्नची घ्यावी लागली.

याविषयी बोलताना नटराज बुक डेपोचे विजय किंगर म्हणाले, आमच्याकडे नव्या व जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची उपलब्ध ९० ते ९५ टक्के एवढी आहे. काही पुस्तके उपलब्ध होत नाहीत. पालकांच्या मागणीनुसार ती मागवली जातात. पण सीबीएसईने जुन्या पुस्तकांमधील केवळ काही धडे वगळले आहेत. त्यामुळे जुनी पुस्तकेही चालू शकतात. सीबीएसईने तसे शाळांना कळविलेही आहे. त्यानंतरही शाळांकडून पालकांना वेठीस धरले जात असेल तर ते चुकीचे आहे. पालकांनी जुनी पुस्तके घेतली तरी त्यामध्ये सध्याच्या अभ्यासक्रमाचे सर्व धडे आहेत, असेही किंगर यांनी स्पष्ट केले.