शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना चारचाकीने उडविले; दोघांचा मृत्यू, बारामतीजवळील घटना

ओंकार संतोष खांडेकर व रुपेश अमोल खांडेकर या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर संस्कार संतोष खांडेकर हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून तो इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे.

शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना चारचाकीने उडविले; दोघांचा मृत्यू, बारामतीजवळील घटना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बारामती (Baramati) तालुक्यातील जळगाव कडेपठार गावातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा (School Students) रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. शाळेत जात असताना एका भरधाव चारचाकीने तिघांना उडविल्याची घटना सोमवारी (दि. ४) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

ओंकार संतोष खांडेकर व रुपेश अमोल खांडेकर या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर संस्कार संतोष खांडेकर हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून तो इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. हे तिघे जण नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाले होते. शाळेत जाण्यासाठी त्यांना मोरगाव-बारामती रस्त्याने जावे लागते.

रस्त्याच्या कडेने जात असतानाच मोरगावकडून बारामतीकडे निघालेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर ही गाडी पुढे जाऊन दुसऱ्या वाहनालाही धडकली. दरम्यान, यावेळी गावामध्ये बंदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी एका वाहनातून जखमींना तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात हलविले.

रुग्णालयात नेल्यानंतर ओंकार खांडेकर व रुपेश खांडेकर यांना मृत घोषित करण्यात आले. तर संस्कार खांडेकर हा गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. दोन विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केले आहे. सुळे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही मुलांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांवर या घटनेमुळे कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. जखमी मुलगा लवकर बरा होऊन घरी परत यावा हि ईश्वरचरणी प्रार्थना.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j