IAS, IPS व्हायचं होतं पण..! निरीक्षक असलेल्या २५ वर्षीय शुभमची आत्महत्या

शुभम हा मुळचा परभणीचा असून तो दोन दिवसांपुर्वी मित्राला भेटण्यासाठी नागपूरमध्ये आला होता. त्यासाठी त्याने एका हॉटेलमध्ये रूम घेतली होती.

IAS, IPS व्हायचं होतं पण..! निरीक्षक असलेल्या २५ वर्षीय शुभमची आत्महत्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षांमध्ये अपयश आल्याने नैराश्यातून तरुण आत्महत्या (Suicide) करत असल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नागपूरमध्ये (Nagpur) अशीच धक्कादायक घटना घडली आहे. आयएएस (IAS), आयपीएस (IPS) होण्याचे स्वप्न भंगल्याने २५ वर्षीय शुभम कांबळे (Shubham Kamble) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. तो अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात निरीक्षक पदावर कार्यरत होता.

 

शुभम हा मुळचा परभणीचा असून तो दोन दिवसांपुर्वी मित्राला भेटण्यासाठी नागपूरमध्ये आला होता. त्यासाठी त्याने एका हॉटेलमध्ये रूम घेतली होती. दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी हॉटेल मॅनेजरने त्याच्या रुममध्ये दुरध्वनीवरून संपर्क साधला होता. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने मॅनेजरने कर्मचाऱ्याला रुमकडे पाठविले होते. अनेकदा आवाज देऊनही शुभमने दरवाजा न उघडल्याने मॅनेजरने पोलिसांना बोलावले.

विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना थेट मंत्रालयात इंटर्नशिपची संधी

 

पोलीस आल्यानंतर रुमचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा सर्वांना धक्का बसला. शुभम रुममध्ये बेशुध्दावस्थेत पडला होता. तसेच त्याच्या जवळ रसायनांच्या बाटल्याही आढळून आल्या. त्याच्याजवळ सुसाईड नोटही आढळून आली असून त्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण लिहिले आहे. शुभमने चार-पाच रसायनांचे मिश्रण करून ते प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे.

 

काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये?

एफडीएमध्ये निरीक्षक असलेल्या शुभमने टोकाचे पाऊल का उचलले, याचा खुलासा सुसाईड नोटमुळे झाला आहे. त्याला आएएस किंवा आयपीएस व्हायचे होते. पण त्यात अपयश आल्याचे त्याने म्हटले आहे. ‘मी स्वत: आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही. मी आयएएस, आयपीएस होऊ शकलो नाही. याची मला खंत आहे', असे शुभमने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO