दहावी-बारावी परीक्षेच्या पुनर्रचनेने कोचिंग क्लासेसला बसणार दणका

बोर्डाची परीक्षा आणि प्रवेश परीक्षांसह माध्यमिक शाळेच्या परीक्षांचे विद्यमान स्वरूप आणि परिणामी बोकाळलेली आजची कोचिंग संस्कृती याने बरीच हानी होत आहे, असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.

दहावी-बारावी परीक्षेच्या पुनर्रचनेने कोचिंग क्लासेसला बसणार दणका
SSC Board Exam representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दहावी-बारावीची परीक्षा (Board Examination) असो किंवा कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा.. अनेक विद्यार्थी कोचिंग क्लासेसला (Coaching Class) पहिले प्राध्यान्य देतात. त्यामुळे देशभरात कोचिंग क्लासेसचे पेव फुटले असून क्लासेस संस्कृती (Coaching Culture) चांगलीच फोफावली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही (NEP 2020) यावरच बोट ठेवून दहावी-बारावीसह (SSC-HSC) विविध प्रवेश परीक्षांचे (Entrance Examination) स्वरुप बदलण्याचे सुतोवाच केले आहे. परीक्षा अधिक लवचिक आणि सोप्या झाल्यास कोचिंग क्लासला जाण्याची गरज भासणार नाही, असे धोरणामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

बोर्डाची परीक्षा आणि प्रवेश परीक्षांसह माध्यमिक शाळेच्या परीक्षांचे विद्यमान स्वरूप आणि परिणामी बोकाळलेली आजची कोचिंग संस्कृती याने बरीच हानी होत आहे, असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. विशेषतः माध्यमिक शाळेच्या स्तरावर हे दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा यथायोग्य अध्ययनासाठी असलेला वेळ, परीक्षांसाठी लागणारे अतिरिक्त कोचिंग आणि तयारी यामध्ये बराच वेळ खर्ची होतो. विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्याय आणि त्यात निवड करण्याची लवचिकता देण्याऐवजी या परीक्षांमुळे मुलांना एकाच शाखेतील अतिशय मर्यादित साहित्याचा अभ्यास करायला भाग पाडले जाते, असेही धोरणात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : द्विलक्षी अभ्यासक्रम : दहावीनंतरच करिअरला दिशा देणारे व्यवसाय शिक्षण

इयत्ता दहावी आणि बारावी साठी असणाऱ्या बोर्ड परीक्षा तशाच चालू राहणार असल्याचे धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, विद्यमान बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या व्यवस्थेत अशा प्रकारे बदल करण्यात येईल की कोचिंग क्लासला जाण्याची गरज भासणार नाही. विद्यमान मूल्यमापन प्रणालीमुळे झालेले हानिकारक परिणाम रोखण्यासाठी बोर्ड परीक्षांची पुनर्रचना केली जाईल, असेही धोरणात म्हटले आहे.

आपल्या वैयक्तिक आवडीनुसार विद्यार्थ्यांना ज्या विषयांसाठी बोर्डाची परीक्षा द्यायची आहे, त्यातील बरेचसे विषय त्यांना निवडता येतील. बोर्ड परीक्षा 'अधिक सोप्या' देखील केल्या जातील, म्हणजे महिनो-महिने केलेले कोचिंग आणि घोकंपट्टीच्याऐवजी प्रामुख्याने मुख्य क्षमता/ योग्यतेची पारख केली जाईल. शाळेच्या वर्गात बसणाऱ्या आणि प्राथमिक प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतेही अतिरिक्त कष्ट न घेता बोर्ड परीक्षेच्या तत्सम विषयात उत्तीर्ण होता येईल आणि चांगली कामगिरी करता येईल, असे धोरणात सुचविण्यात आले आहे.

बोर्ड परीक्षेशी संबंधित 'उच्च जोखीम' पैलू दूर करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना, त्यांची इच्छा असल्यास कोणत्याही एका शालेय वर्षामध्ये दोनदा बोर्ड परीक्षेला बसता येईल, एक मुख्य परीक्षा आणि एक सुधारणा करण्यासाठी परीक्षा. अधिक लवचिकता, विद्यार्थ्यांना निवड करण्याचा पर्याय, आणि दोन-प्रयवांमधील सर्वोत्तम या बदलांव्यतिरिक्त, प्रामुख्याने मुख्य क्षमतेची पारख करणारे मूल्यमापन, या बोर्ड परीक्षेतील महत्त्वाच्या प्रमुख सुधारणा असतील, यावरही धोरणात प्रकाश टाकण्यात आला आहे.

हेही वाचा : अकरावी प्रवेशाला सुरूवात; प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरा या तारखेपासून

कालांतराने बोर्डातर्फे बोर्ड परीक्षांचे व्यवहार्य नमुने मॉडेल्स विकसित केले जातील, जे बोर्ड परीक्षांचा तणाव कमी करतील आणि कोचिंग संस्कृती कमी करतील. यामध्ये पुढील शक्यतांचा समावेश असू शकतो: वार्षिक/सहामाही/मोड्युलर बोर्ड परीक्षांची प्रणाली विकसित करता येईल अशी प्रणाली ज्यामध्ये परीक्षा बऱ्यापैकी कमी साहित्यावर आधारित असतील आणि शाळेमध्ये संबंधित अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर लगेच घेतल्या जातील. जेणेकरून माध्यमिक स्तरावर परीक्षांचा तणाव योग्यपणे विभागला जाईल, तीव्रता कमी असेल आणि मोठ्या जोखमीचे प्रमाण कमी असेल:

गणितापासून सुरू करून सर्व विषय आणि त्यांचे मूल्यमापन दोन स्तरांवर उपलब्ध करून देता येईल, ज्यामध्ये विद्यार्थी काही विषय सामान्य स्तरावर शिकतील आणि काही विषय उच्च स्तरावर आणि काही विषयांच्या बोर्ड परीक्षाची पुनर्रचना करून त्यांचे दोन भाग करता येतील एक भाग असेल वस्तुनिष्ठ ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतील आणि दुसऱ्या भागात वर्णनात्मक प्रश्न असतील, असे धोरणामध्ये नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2

NEP 2020 Page 23