सिनेट सदस्य सचिन गोरडे पाटील यांचे गंभीर आरोप

कर्मचाऱ्यांच्या विम्याच्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीला जमा करण्यात अनियमितता झाली असल्याचा आरोप.

सिनेट सदस्य सचिन गोरडे पाटील यांचे गंभीर आरोप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या विम्याच्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीला जमा करण्यात अनियमितता झाली असल्याचा आरोप विद्यापीठाचे आधिसभा सदस्य सचिन गोरडे पाटील यांनी केला.तसेच विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाला शंभर कोटी रुपये निधी वर्ग केल्याचा आरोपही त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

   विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी व्यवस्थापन परिषदेत विद्यापीठाच्या कामकाजावर शनिवारी नाराजी व्यक्त केली.तसेच विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सचिन गोरडे पाटील यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांनी स्वतःला केवळ बारा लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याचे अधिकार असताना विमा कंपनीला तीन कोटी रुपयांपर्यंतची रक्कम वर्ग केल्याचा आरोप केला.

गोरडे पाटील म्हणाले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने याबाबत विरोध केलेला असताना कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर करून विमा कंपनीला तीन कोटी रुपये दिले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून प्रश्नपत्रिका डीटीपी व प्रूफ रीडिंगसाठी 15 कोटी रुपये विनाकारण खर्च केले जात असल्याचा आरोपही गोरडे पाटील यांनी केला.

विद्यापीठाच्या आधिसभेमध्ये गोरडे पाटील यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्या कामकाजावर आक्षेप घेत विभागाच्या अभ्यासक्रमाची व आर्थिक बाबींची चौकशीची मागणी केली.त्यानंतर शनिवारी पत्रकार घेलेल्या परिषदेत त्यांनी रुसाकडून प्राप्त होणा-या निधीचे सर्वाधिक वाटप तंत्रज्ञान विभागालाच केले जातात. या विभागाला तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंतचा निधी दिल्याचा आरोपही गोरडे पाटील यांनी केला.

दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून पूर्ण माहिती घेऊन गोरडे पाटील यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले.