अंगणवाडी सेविकांचे नवीन वर्षांच्या मुहूर्तावर आंदोलन

अंगणवाडी सेविका येत्या १ व ३ जानेवारी रोजी विविध ठिकाणी आंदोलन करणार आहेत. 

अंगणवाडी सेविकांचे नवीन वर्षांच्या मुहूर्तावर आंदोलन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनिस ४ डिसेंबरपासून संपावर आहेत. त्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी वर्ग कित्येक दिवासांपासून बंद आहेत. परिणामी मुले प्राथमिक पूर्व शिक्षणापासून आणि पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. राज्यभरातील अंगणवाड्यांना टाळे लागले तरी अद्याप शासनाने याची दखल घेत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका येत्या १ व ३ जानेवारी रोजी विविध ठिकाणी आंदोलन करणार आहेत. 

 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने इंदापूर येथील तहसिलदार कार्यालयाजवळ १ जानेवारीला सकाळी ११ वाजता 'चलो जेलभरो आंदोलन' तर १ जानेवारीलाच पुण्यातील लाल महलाजवळ काही अंगणवाडी सेविका एकत्र जमणार आहेत. तसेच येत्या ३ जानेवारीला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील अंगणवाडी सेविका एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत.

--------

काय आहेत प्रमुख मागण्या : 

- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.

- अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. मानधन किमान १८ हजार ते २६ हजारापर्यंत असावे. 

- मानधन महागाई निर्देशंकाला जोडून दर सहा महिन्यांनी निर्देशंकानुसार वाढ करण्यात यावी

- अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर मासिक निर्वाह भत्ता देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा.

--------

कित्येक दिवसांपासून आमचा संप सुरू आहे, पंरतु, अद्याप प्रशासन किंवा शासनाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. संपाचा परिणाम मुलांवर होत आहे. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्या टप्प्याटप्याने पूर्ण कराव्यात. मानधनात तात्काळ वाढ केली तरच आम्ही पुन्हा सेवेस हजर राहू. 

- पुनम निंबाळकर, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, पुणे ,उपाध्यक्ष, इंदापुर तालुका

-------

- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण आहार शिजवण्याशिवाय आणि शिक्षणाव्यतिरिक्त इतर शासकीय कामांचा भार खूप आहे. त्यामुळे सध्याच्या मानधनात ते परवडणारे नाही. त्यामुळे लवकरात लवकर आमच्या मानधनात वाढक रण्यात यावी.

- सुरेखा मिसाळ, अंगणवाडी सेविका.

-------

-महिला बाल कल्याण विकास अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेतन दिले जाते. केवळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच मानधन देण्यात येते. अंगणवाडी सेविकांची पदे भरताना घटस्फोटीत किंवा विधवा महिलांना प्राधान्य देण्यात येते. जर एखादी अंगणवाडी सेविका अशा प्रवर्गातून येत असेल तर सध्याच्या मानधनात ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी कशी पार पाडू शकेल,याचा विचार करून मानधनात वाढ करण्यात यावी. 

- अनिता आवळे, अंगणवाडी सेविका 

------