व्यसनी शिक्षकांनो खबरदार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली मोठी घोषणा, लवकरच परिपत्रक काढणार

कुणी तंबाखू खात असेल, मद्यप्राशन करत असेल तर हे सहन केले जाणार नाही, असे दीपक केसरकर यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना स्पष्ट केले आहे.

व्यसनी शिक्षकांनो खबरदार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी  केली मोठी घोषणा, लवकरच परिपत्रक काढणार
School Education Minister Deepak Kesarkar

निकिता पाटील/ राजानंद मोरे

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी व्यसनी शिक्षकांना (Addicted Teachers) धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. तंबाखू खाणारे, मद्यप्राशन करणारे शिक्षक आढळून आल्यास त्यांना थेट 'डाएट' (Diet) या संस्थेत पाठविले जाणार असून तिथे कसे वागावे याचे शिक्षण (Education) दिले जाणार आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही केसरकर यांनी दिली आहेत.

केसरकर यांनी सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जी २० (G 20) परिषदेनिमित्त भरविण्यात आलेल्या शैक्षणिक प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी 'एज्युवार्ता'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यसनी शिक्षकांबाबत महत्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले, मुलांना व्यवस्थित शिकवले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना लक्ष केंद्रित करण्याची संधी दिली पाहिजे. यापुढे एका शिक्षकाला ती शाळा दिली पाहिजे. ती शाळा त्यांचे मंदिर असेल. ते विकसित केले पाहिजे. म्हणून आम्ही प्रशासकीय बदल्या रद्द केल्या आहेत. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवे, त्या शाळेत मुलांची संख्या वाढली पाहिजे, ही यापुढे शिक्षकांची जबाबदारी राहील.

शिक्षणतज्ज्ञ आमनेसामने; 'ते' ३३ शिक्षणतज्ज्ञ राजकीय अजेंडा पुढे रेटत असल्याचा ७१ जणांचा गंभीर आरोप

दर्जेदार शिक्षण देताना शिक्षकांनी कसे वागावे, याबाबत लवकरच एक परिपत्रक काढणार आहोत. कारण शिक्षकांकडे पाहून पुढची पिढी बनत असते. कुणी तंबाखू खात असेल, मद्यप्राशन करत असेल तर हे सहन केले जाणार नाही. त्यांना पहिली शिक्षा अशी असेल की, त्यांना जिल्हा शिक्षण व संशोधन संस्थेत (डाएट) पाठवून व्यसनातून कसे बाहेर पडायचे, हे शिकवले जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. याबाबतचे परिपत्रक लवकरच काढणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

जे शिक्षक शिक्षणात कमी पडतील, त्यांना डाएट कॉलेजमध्ये अधिकचे शिक्षण दिले जाईल. ही शिक्षा नाही, पण त्यांची ही जबाबदारी आहे. मला शिक्षकांबद्दल आदर आहे. पण मला कुठेही असे आढळून आले की, एखाद्या शिक्षकामुळे मुलांचे नुकसान होत आहे. तर त्यांना पुन्हा शिक्षण दिले जाईल. त्यांचे शिक्षकाचे उपजत गुण अधिक प्रगल्भ केले जातील आणि मुलांना न्याय दिला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले. यापुढील काळात सरकारी शाळा खाजगी शाळांपेक्षा चांगल्या असतील, यासाठी आम्ही विशेष उपक्रम पुढील वर्षभरात राबविणार आहोत, त्याचे परिणाम दिसून येतील.  

विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे घेऊन जाणा-या प्रदर्शनाची विद्यापीठात मेजवानी...

१७ हजार शाळांमध्ये ज्युनिअर व सिनिअर केजी

सध्या शाळांमध्ये जुनिअर, सिनिअर केजी नाहीत. त्यामुळे अंगणवाडीतून विद्यार्थी थेट पहिलीत जातात. तो प्रश्न आपल्याला सोडवायला लागेल. कदाचित येत्या शैक्षणिक वर्षापासून ज्या अंगणवाड्या शाळेला जोडल्या आहेत, अशा जवळपास १७ हजार शाळांमध्ये ज्युनिअर आणि सिनिअर केजी सुरू करत आहोत, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo