SPPU पीएचडी गाईड लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात ; शोध प्रबंध सादर करण्यासाठी मागितले 25 हजार 

सांगवी येथील बाबुराव घोलप महाविद्यालयातील डॉ.शकुंतला निवृत्ती माने या महिला प्राध्यापिकेला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

SPPU पीएचडी गाईड लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात ; शोध प्रबंध सादर करण्यासाठी मागितले 25 हजार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पीएचडी (PHD)शोधप्रबंध सादर करून त्याला मान्यता देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न बाबुराव घोलप महाविद्यालयातील (baburao gholap college)प्राध्यापिका व पीएचडी मार्गदर्शक अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी संबंधित महिला प्राध्यापिकेवर कारवाई केली. काही महिन्यांनंतर ती महाविद्यालयातून सेवानिवृत्त होणार होती.                       

 पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा गोरख धंदा अनेक प्राध्यापकांकडून केला जातो.त्यात सर्वच प्राध्यापक सापडत नाहीत. मात्र, पीएचडी शोध प्रबंध सादर करण्यासाठी आणि त्याला मान्यता देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना नुकतीच समोर आली.याप्रकरणी सांगवी येथील बाबुराव घोलप महाविद्यालयातील डॉ.शकुंतला निवृत्ती माने या महिला प्राध्यापिकेला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. डॉ. शकुंतला माने ही बाबुराव घोलप महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाची प्राध्यापिका आहे. तिने पीएच.डी.चे मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएचडीचा शोध प्रबंध विद्यापीठाकडे सादर करून त्याला मान्यता घेण्याची प्रक्रिया पीएचडी गाईडच्या माध्यमातून केली जाते. शकुंतला माने यांनी त्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत 40 वर्षीय प्राध्यापक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 25 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेतल्यानंतर संबंधित महिला प्राध्यापिकेला ताब्यात घेण्यात असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शकाने कोणत्याही स्वरूपाची रक्कम घेऊ नये, याबाबत विद्यापीठाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. तरीही अशा स्वरूपाची प्रकरणे समोर येत आहेत. विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेश प्रक्रिये दरम्यान काही महाविद्यालयाकडून प्रत्येकी एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जाते. सुमारे वर्षभरापूर्वी याच संस्थेच्या एका महाविद्यालयाविरोधात विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली होती.पीएचडी प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने प्रत्येकी एक हजार रुपये रक्कम घेतली होती. परंतु, अद्याप याबाबत ठोस निर्णय घेतला गेला नाही.