आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ?

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे.

आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविली जाणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया (RTE Admission Process)सुरू झाली असून शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून (First week of April) विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे,असे राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील (Department of Primary Education)वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पालकांना लवकरच आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेशाचा अर्ज भरता येणार आहे.तसेच चालू शैक्षणिक वर्षांपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा अंतर्भाव केला जाणार आहे. 

आरटीई कायद्यात झालेल्या बदलामुळे सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्ये सुध्दा आरटीई अंतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत.त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशासाठी पात्र असलेल्या शाळांची संख्या वाढली आहे.यंदा राज्यातीलअ 75 हजार 856 शाळांमधील 9 लाख 71 हजार 203 जागांवर आरटीईतून प्रवेश दिले जाणार आहेत.मात्र,त्यास कसा प्रतिसाद मिळतो हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा,यासाठी पालक इच्छुक आहेत.मात्र,परिसरात सरकारी शाळा असताना आरटीईतून विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिल्यास संबंधित शाळेला शासनाकडून शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम दिली जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.परिणामी अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आरटीई प्रवेश देण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.लवकरच या शाळा आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते.

राज्यात आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी व विद्यार्थी प्रवेश क्षमता यात वाढ झाल्याचे दिसून येत असले तरी सर्व प्रवेश हे शासकीय किंवा खासगी अनुदानित शाळांमध्येच होतील,असे बोलले जात आहे.त्यामुळे विविध पालक संघटनांनी या प्रक्रियेस विरोध केला होता.मात्र,शासनाकडून त्याची गांभीर्याने दाखल घेतली गेली नाही.