संस्थाचालकाला पोलीस अधिकाऱ्याने दिला त्रास; न्यायालयाच्या आदेशानंतर खंडणीचा गुन्हा दाखल

तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर भास्करराव घनवट आणि पोलीस राईटर विजय विश्वनाथ शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पद्माकर घनवट हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत.

संस्थाचालकाला पोलीस अधिकाऱ्याने दिला त्रास; न्यायालयाच्या आदेशानंतर खंडणीचा गुन्हा दाखल

सातारा जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकाला एका गुन्ह्याच्या चौकशी दरम्यान ब्लॅकमेल करून बेकायदेशीरपणे तब्बल १२ लाख ३० हजार रुपये घेणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर व पोलीस राईटरवर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर भास्करराव घनवट आणि पोलीस राईटर विजय विश्वनाथ शिर्के यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.पद्माकर घनवट हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत.

सातारा जिल्ह्यातील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक संचालक व बांधकाम व्यावसायिक आणि या प्रकरणातील फिर्यादी राजेंद्र मधुकर चोरगे (वय ५७,रा. शनिवार पेठ ,सातारा) यांनी पोलीस अधिकारी त्रास देत असल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा; याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. तसेच त्या संदर्भातील पुरावे सादर केले होते. त्यावर दुसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.साळवे यांच्या न्यायालयाने सीआरपीसी क. १५६/३ प्रमाणे आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर भास्करराव घनवट आणि राईटर विजय विश्वनाथ शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर चोरगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व रायटर विजय शिर्के यांनी गुरुकुल संस्थेमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करून गुन्हेगारांना मदत करणे. तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या ३२१/२०१६ या गुन्ह्याच्या चौकशी दरम्यान मला त्रास देऊन ब्लॅकमेलिंग केले.तसेच मला ताब्यात ठेवून माझी इच्छा नसताना माझ्याकडून २५ लाख रुपयांची मागणी करुन आत्तापर्यंत १२ लाख ३० हजार रुपये घेतले. त्याचप्रमाणे वेळोवेळी पोलीस स्टेशनला बोलून त्रास देऊन पैसे व मोबाईल काढून घेतला. वारंवार मानसिक त्रास दिला.माझ्या पत्नीला व गुरुकुल संस्थेच्या महिला प्रिन्सिपल व कर्मचाऱ्यांना सूर्यास्तानंतरही नाहक अटकवून ठेवले.

गुन्हा क्रमांक ३२१/२०१६ गुन्ह्यामधील फिर्यादीला तीन कोटी रुपये देण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे आमच्या विरुद्ध गुन्ह्याबाबत फिर्याद कोर्टामध्ये दाखल करून त्याची झेरॉक्स आम्हाला दाखवून पैशाची मागणी केली. तसेच ती फिर्याद नंतर पोलीस कोर्ट रजिस्टर मधून फाडून टाकली. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची चार वेळा प्राथमिक व विभागीय चौकशी केली. त्यामध्ये आरोपी दोषी असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

--------------

पोलीस खात्यात बहुतांश पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रामाणिक आहेत. काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे पूर्ण पोलीस खाते बदनाम होते, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून काढून टाकले पाहिजे. मला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.

- राजेंद्र चोरगे, सहाय्यक संचालक, गुरुकुल एज्युकेशन सोसायटी ,सातारा