RTE : पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागणार; प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना प्रसिध्द

यापूर्वी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही, याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी.

RTE : पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागणार;  प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना प्रसिध्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (Right to Education Act) 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी येत्या 17 मे ते 31 मे या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज (RTE Online Admission Process) स्वीकारले जाणार आहेत.त्यासाठी शिक्षण विभागातर्फे (Department of Education)आवश्यक मार्गदर्शन सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या बालकाच्या पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.यापूर्वी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही, याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी,असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी (Director of Primary Education Sharad Gosavi)यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.  

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना-
* बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्टया मागास घटकांतील बालकांना स्वंयअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये इयत्ता १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरिता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रीया विहित मुदतीत पुर्ण करावी.

* आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.
* २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरीता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी.
* पालकानी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनव्दारे निवास्थनाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल, याची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.
* प्रवेशप्रक्रीयेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी.
* अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल, याची दक्षता घेण्यात यावी.
*  प्रवेश प्रक्रीयेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करुन समस्येचे निराकरण करण्यात यावे.
* पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. (उदा. घरचा पता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, जातप्रमाणपत्र इ.)
* ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पून्हा अर्ज करता येणार नाही.
*  यापूर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा, एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
* पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करु नयेत.

* आरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे