‘शुन:शेप’मधील भावविश्व आता हिंदीत

माझ्या कवितांमधील गुंतागुंत, जटिलता, दृश्य, चित्रे यांमधील भाव हिंदीमध्येदेखील सुंदररीत्या, समतुल्य पद्धतीने आणल्याचे खुद्द डहाके यांनी म्हटले आहे.

‘शुन:शेप’मधील भावविश्व आता हिंदीत
Book publishing program

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, कवी वसंत आबाजी डहाके (Vasant Aabaji Dahake) यांच्या ‘शुन:शेप’ कवितासंग्रहाचे हिंदी भाषांतर करण्यात आले आहे. मॉडर्न महाविद्यालयातील (Modern College) हिंदी विभागप्रमुख डॉ. प्रेरणा उबाळे (Dr. Prerna Ubale) यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. माझ्या कवितांमधील गुंतागुंत, जटिलता, दृश्य, चित्रे यांमधील भाव हिंदीमध्येदेखील सुंदररीत्या, समतुल्य पद्धतीने आणल्याचे खुद्द डहाके यांनी म्हटले आहे.

भाषांतरित काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झाला. यावेळी कवी वसंत आबाजी डहाके, डॉ. दामोदर खडसे, डॉ. सुनील देवधर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख प्रा. मनोहर जाधव, आणि प्रा. गजानन चव्हाण आदी उपस्थित होते. डहाके म्हणाले, “डॉ. प्रेरणा यांनी केलेले भाषांतर हे अत्यंत दर्जेदार झाले आहे.  मुळातच कवितांचे भाषांतर करणे हे अत्यंत कठीण आहे परंतु ‘शुन:शेप’ मधील सर्व भाषांतरित कविता या हिंदीतीलच आहेत असा भास होणे म्हणजेच त्या भाषांतराचे यश आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

डॉ. उबाळे यांनी काव्यसंग्रहाचे भाषांतर करताना आलेले अनुभव सांगितले तसेच भाषांतर करत असताना वसंत डहाके आणि प्रभा गणोरकर यांनी सप्रसंग केलेले विश्लेषण महत्वाचे ठरले असे सांगितले. डॉ. खडसे यांनी डॉ. प्रेरणा यांनी केलेले भाषांतर अत्यंत प्रवाहपूर्ण असल्याचे सांगितले. डहाके यांचे साहित्य यानिमित्ताने प्रथमच हिंदी भाषेमध्ये जात असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमामध्ये डॉ. जाधव यांनी भाषांतराचे महत्व कथन केले आणि हिंदी भाषेच्या माध्यमातून मराठी भाषेतील साहित्य मोठ्या स्तरावर वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले. प्रा. चव्हाण यांनीही या भाषांतरित संग्रहामधील सर्जनशीलतेची प्रशंसा केली. उपस्थित साहित्य रसिकांनी डहाके यांनी स्वत: एक कविता वाचावी असा आग्रह केल्यानंतर त्यांनी मूळ मराठीतील ‘मुलं हसताहेत’ या कवितेचे अभिवाचन केले आणि त्यानंतर डॉ. प्रेरणा यांनी या कवितेच्या भाषांतराचे अभिवाचन केले. सर्वांनी दोन्ही कवितांना मनसोक्त दाद दिली.

मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, उपप्राचार्य डॉ. विजय गायकवाड, कवी मंगेश काळे, डॉ. गोरख थोरात, डॉ. ओमप्रकाश शर्मा, डॉ. निलय उपाध्याय, इंदिरा पूनावाला, विवेक काटीकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रा. मिलिंद जोशी, डॉ. ओंकारनाथ शुक्ला, प्रा. असीर मुलाणी, प्रा. संतोष तांबे  आणि विद्यार्थीही उपस्थित होते.