प्रश्नपत्रिका गोपनीय राहतील का? प्रवेशपत्र लिक झाल्याने विद्यार्थी चिंतेत

विद्यार्थी वर्षानुवर्षे परिक्षेच्या तयारीत घालवतात. पण परिक्षेपुर्वीच जर प्रवेशपत्र लिक झाल्याच्या घटना घडत असतील तर त्याने विद्यार्थ्यांचे मनोबल खच्ची होते, अशी निराशाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

प्रश्नपत्रिका गोपनीय राहतील का? प्रवेशपत्र लिक झाल्याने विद्यार्थी चिंतेत
MPSC Hall Ticket Leak

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशपत्र (Hall Ticket) लिक झाल्याचे समोर आल्यानंतर आता विद्यार्थ्यांना वेगळीच चिंता सतावू लागली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांप्रमाणे एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकाही (Question Paper) फुटणार नाहीत ना, अशी शंका विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत. विद्यार्थी वर्षानुवर्षे परिक्षेच्या तयारीत घालवतात. पण परिक्षेपुर्वीच जर प्रवेशपत्र लिक झाल्याच्या घटना घडत असतील तर त्याने विद्यार्थ्यांचे मनोबल खच्ची होते, अशी निराशाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. (Students are worried due to MPSC exam admit card being hacked)

आयोगाने जारी केलेली तब्बल ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र एका टेलिग्राम चॅनेलवर व्हायरल करण्यात आली आहे. या चॅनेलवर प्रश्नपत्रिका तसेच विद्यार्थ्यांची माहितीही आपल्याकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रवेशपत्र लिक झाल्याची कबुली आयोगानेही दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांची इतर व्यक्तिगत माहिती तसेच प्रश्नपत्रिका लिक झाली नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. संबंधित हॅकरविरोधात पोलिसांतही तक्रार केल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : प्रवेशपत्र लिक झाल्याची MPSC कडूनही कबुली; प्रकरण थेट पोलिसांत

आयोगाने प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांना आश्वस्त केले असले तरी परीक्षेच्या काही दिवस आधीच प्रवेशपत्र लिक झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा दिपक नाईकवाडे म्हणाला, आता आलेल्या माहिती नुसार विद्यार्थ्याचे हॉल तिकीट हॅक झाली आहेत. अशा गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो व त्याचबरोबर मनोबलही खचते. त्यामुळे अशा गोष्टी पुन्हा  घडू नयेत, म्हणून आयोगाने दक्षता घ्यायला हवी.

प्रश्नपत्रिका गोपनीय राहील का, असा सवाल एका विद्यार्थ्यानीने उपस्थित केला. नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर ‘एज्युवार्ता’शी बोलताना ती म्हणाली, हॉल तिकीट हॅक झाल्याने परीक्षेबाबतची इतर माहिती तरी गोपनीय राहील का?, अशी शंका वाटत आहे. अशा घटनांचा अभ्यासावर परिणाम होत असून, आमच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

दरम्यान, संबंधित टेलिग्राम चॅनेलचे स्क्रीन शॉट सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी हे स्क्रीन शॉट ट्विट करत याबाबत एमपीएससीला सवाल केले आहेत. आमदार सत्यजित तांबे यांनीही हे प्रकरण खूप गंभीर असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी असे प्रकार सतत घडत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.