मुक्त विद्यापीठाच्या शुल्कात १८ टक्के वाढ ; ७० ते ७५ टक्के शुल्कवाढीचे कुलगुरूंकडून खंडन

विद्यापीठाला एका विद्यार्थ्यांमागे विद्यापीठ फंडातून सुमारे १ हजार ६०० रुपये खर्च करावे लागत होते. त्यामुळे दरवर्षी विद्यापीठाला स्वत:च्या फंडातून ८० कोटी रुपये खर्च करावे लागत होते.

मुक्त विद्यापीठाच्या शुल्कात १८ टक्के वाढ ; ७० ते ७५ टक्के शुल्कवाढीचे कुलगुरूंकडून खंडन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) शुल्कामध्ये तब्बल १३ वर्षांनंतर वाढ (Fee increase) करण्यात आली असून ही वाढ कोणताही नफा कामावण्यासाठी केलेली नाही. विद्यापीठाला एका विद्यार्थ्यांमागे विद्यापीठ फंडातून सुमारे १ हजार ६०० रुपये खर्च करावे लागत होते. त्यामुळे दरवर्षी विद्यापीठाला स्वत:च्या फंडातून ८० कोटी रुपये खर्च करावे लागत होते. हा खर्च जुळवून आणण्यासाठीच विद्यापीठाने शुल्कात काही प्रमाणात वाढ केली आहे. शुल्कवाढीचा निर्णय घेतला नसता तर पुढील ५ ते ७ वर्षात विद्यापीठ बंद करण्याची वेळा आली असती,असे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे (Dr. Sanjeev Sonawane Vice-Chancellor of Yashwantrao Chavan Maharashtra Open University) यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: विद्यार्थ्याने लिहिले कुलगुरूंना आत्महत्येचे पत्र...

मुक्त विद्यापीठाच्या शुल्कामध्ये ७० ते ७५ टक्के वाढ केल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिध्द केल्याने समाजात विद्यापीठाविषयी गैरसमज निर्माण झाला.तसेच शुल्कवाढ केल्याने प्रवेश घटले,अशी चूकीची माहिती सुध्दा प्रसिध्द झाली. मात्र, या शुल्कवाढीचे व माहितीचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी खंडन केले आहे.ते म्हणाले विद्यापीठाने १३ वर्षांपूर्वी शुल्कवाढ केली होती. त्यानंतर या वर्षी केवळ १८ टक्के शुल्क वाढवले आहे.विद्यापीठांतर्गत प्रवेश घेण-या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे लागते.त्यासाठी विद्यापीठाला एका विद्यार्थ्यामागे १ हजार ६०० रुपये खर्च येत होता. दरवर्षी सुमारे पाच लाख विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेतात.या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्यासाठी विद्यापीठाकडून केल्या जाणा-या खर्चाची रक्कम आकारली जात नव्हती. तसेच राज्य व केंद्र शासनाकडून घेतल्या जाणा-या अश्वमेध, इंद्रधनुष्य आशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आकारले जाणारे शुल्क सुध्दा स्वीकारले जात नव्हते.विद्यापीठ स्वत:च हे शुल्क भरत होते.त्यामुळे विद्यापीठाने कोणतीही मोठी शुल्कवाढ केली नाही.

सोनवणे म्हणाले, विद्यापीठ हे स्वयंनिर्वाही असून ते केवळ विद्यार्थ्यांकडून जमा होणा-या शुल्कावर चालते.त्यातूनच कुलगुरू ते शिपाई या पदापर्यंतच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन केले जाते.त्याचाप्रमाणे परीक्षांचे नियोजन करणे, प्रश्नपत्रिका व  उत्तरपत्रिका छपाई, परीक्षांचा इतर खर्च , शैक्षणिक साहित्य लेखन करणा-या लेखकांचा खर्च , विद्यापीठातील विकास कामे विद्यार्थ्यांकडून जमा होणा-या शुल्कातूनच केली जातात.विद्यार्थ्यांचा निकाल ३० दिवसात लावला जातो.त्यासाठी ऑनस्कीन मूल्यमापन प्रणालीचा वापरली जाते.एक पेपर तपासण्यासाठी सुमारे २४ रुपये खर्च येतो.त्यामुळे पुढील काळात विद्यापीठ चालू ठेवण्यासाठी विद्यापीठाने स्वत:वर घेतलेल्या खर्चाचा बोजा त्या-त्या घटकावर टाकणे गरजेचे होते.

विद्यापीठाला शासनाचे अनुदान मिळत नाही.त्यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून १८ टक्के शुल्क वाढ केली आहे.तसेच विद्यार्थी प्रवेश संख्या जराही कमी झालेली नाही.मागील वर्षी ५ लाख २ हाजार ६३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.१९ ऑगस्टपर्यंत सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाखांच्या पुढे जाईल,असेही सोनवणे यांनी सांगितले.