आता पुस्तक घेऊन देता येईल परीक्षा 

येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षांमध्ये ओपन बुक एक्झाम प्रणाली लागू करण्याची CBSE बोर्डाची तयारी सुरु आहे.

आता पुस्तक घेऊन देता येईल परीक्षा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता नववी व दहावी सारख्या महत्वाच्या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना जर पुस्तक घेऊन परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली तर !  पुढच्या शैक्षणिक वर्षापासून ही बाब सत्यात उतरणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनशी (CBSE) संलग्न सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या नववी ते बारावीच्या परीक्षांमध्ये ओपन बुक एक्झाम Open Book Exam (ओबीई) ही प्रणाली लागू करण्याची तयारी बोर्ड करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार CBSE काही शाळांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ओबीईद्वारे परीक्षा घेण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. परीक्षेला किती वेळ लागतो हे पाहण्यासाठी चाचणी म्हणून या शाळा ओपन बुक परीक्षा पद्धतीने परीक्षा घेतील.

ओपन बुक परीक्षा प्रणाली लागू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान स्वतःची पुस्तके किंवा अभ्यास साहित्य किंवा नोट्स इत्यादी सोबत ठेवण्याची मुभा असेल. तसेच, परीक्षेत विचारलेले प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना या अभ्यास साहित्याची मदत घेता येईल. दरम्यान कोरोना काळात दिल्ली विद्यापीठाने ओपन बुक परीक्षा पद्धतीने परीक्षा घेतल्या होत्या.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या तरतुदींच्या दिशेने CBSE द्वारे ओपन बुक परीक्षा प्रणालीवर काम केले जात आहे. NEP 2020 वर आधारित राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क नुसार  इयत्ता नाववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा अभ्यास साहित्यासह परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते. या संदर्भात बोर्डाने आता काही शाळांना प्रायोगिक तत्वावर ओबीईच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांच्या परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.