पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या काठिण्य पातळीची परीक्षा परिषदेकडून चौकशी

परीक्षा परिषदेकडून तज्ज्ञांशी चर्चा करून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे येथे आठवड्याभरात या प्रकरणाबाबत स्पष्टता येणार आहे.

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या काठिण्य पातळीची परीक्षा परिषदेकडून चौकशी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Scholarship Exam News : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (Class V Scholarship Exam)विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी (difficulty level)विद्यार्थी वयोगटापेक्षा अधिक होती. त्यामुळे या परीक्षेबाबत शिक्षणक्षेत्रातील अभ्यासकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून तज्ज्ञांशी चर्चा करून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे येथे आठवड्याभरात या प्रकरणाबाबत स्पष्टता येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना दिली.

राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 18 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. इयत्ता पाचवीसाठी 5 लाख 10 हजार 707 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 4 लाख 92 हजार 227 विद्यार्थी परीक्षेत हजर राहिले. तर 18  हजार 480 विद्यार्थी परीक्षेत गैरहजर राहिले. मात्र,  गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षक नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पाचवीच्या इंग्रजी बुद्धिमत्ता पेपरची काठीण्य पातळी जास्त होती, असे बोलले जात आहे. त्यामुळे परीक्षा परिषदेने सुद्धा याबाबत दखल घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे म्हणाले, इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची काठीण्य पातळी अधिक होती, या संदर्भातील काही बातम्या वाचण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तज्ञांशी चर्चा करून याबाबत माहिती घेतली जाणार आहे. येत्या आठवड्याभरात या संदर्भातील सविस्तर माहिती समोर येईल.