नेहरू शिक्षण संस्थेची थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार; नागरिकांचे संस्थाचालकांवर गंभीर आरोप

पुण्यातील पाषाण भागातील माजी नगरसेवक तानाजी निम्हण, या शाळांचे माजी विद्यार्थी आणि पालकांनी  संबंधित शिक्षण संस्थेविषयी तक्रार केली आहे. या शाळांचे पत्र थेट पंतप्रधान कार्यालयात पोहचल्याने त्याची दखल घेतली जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

नेहरू शिक्षण संस्थेची थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार; नागरिकांचे संस्थाचालकांवर गंभीर आरोप

दीपा पिल्ले पुष्पकांथन

शंभर टक्के अनुदानित असून देखील केवळ व्यावसायिक फायद्यासाठी पुणे (Pune) आणि आसपासच्या परिसरातील काही शाळा (Schools in Pune) बंद पाडण्यात येत आहेत. यापैकी ४ शाळा एकाच शैक्षणिक संस्थेच्या आहेत. या संस्थेविषयी आता थेट पंतप्रधान  कार्यालयात (PMO) तक्रार करण्यात आली आहे. नेहरू शिक्षण संस्था (Nehru Education Institute) संचलित गो. रा. कुंभार माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, पाषाण, गो. रा. कुंभार प्राथमिक विद्यालय, कमला नेहरू प्राथमिक विद्यालय, चिंचवड, श्री नागेश्वर विद्यालय निमोणे, तालुका शिरूर या सर्व शाळांच्या वर्ग - तुकड्या  संस्थेच्या अनियमित कारभारामुळे बंद पडल्या आहेत, अशी तक्रार पंतप्रधान कार्यालयात केली आहे.

 

'एज्युवार्ता' च्या टीमने काही दिवसांपूर्वी या बंद शाळांची पाहणी करून या विषयी बातमी प्रसिद्ध केली होती. यासंदर्भात आता नागरिकांनी पुढाकार घेत पुण्यातील पाषाण भागातील माजी नगरसेवक तानाजी निम्हण, या शाळांचे माजी विद्यार्थी आणि पालकांनी  संबंधित शिक्षण संस्थेविषयी तक्रार केली आहे. या शाळांचे पत्र थेट पंतप्रधान कार्यालयात पोहचल्याने त्याची दखल घेतली जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

भावी शिक्षिकेचं काय चुकलं? केसरकरांकडून वर्षभरापुर्वी भरतीची घोषणा, अजून एकही जाहिरात नाही...

 

'एज्युवार्ता' शी याविषयी बोलताना तानाजी निम्हण म्हणाले, " सुमारे १९६० साली लोकवर्गणीतून  पाषाण येथे नेहरू शिक्षण संस्थेची गो. रा. कुंभार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा स्थापन करण्यात आली. ग. ल. संकपाळ यांच्या  पुढाकाराने ही शाळा स्थापन करण्यात आली. विशेष म्हणजे पाषाण आणि त्याच्या आसपास च्या परिसरात तो पर्यंत ७ वी पर्यंतच शाळा होती. गो. रा. कुंभार शाळेमुळे पाषाण तसेच  आसपास चे घरोबा वर्गातील विद्यार्थी ज्यांना पुढच्या  शिक्षणासाठी पुणे शहरातील शाळांमध्ये जाणे शक्य नव्हते असे विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण घेऊ लागले.’’ 

 

आश्चर्याची बाब म्हणजे अजूनही या भागात गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना ही शाळा सोडल्यास दुसरी शाळा उपलब्ध नाही. पण या संस्थेचे संस्था चालक संभाजी कुंजीर यांनी स्वतःच्या व्यावसाईक फायद्यासाठी ही सुमारे १००० हजार पटसंख्या असलेली शाळा शून्य पटसंख्येवर आणून बंद पडली, असा आरोप निम्हण यांनी केला आहे. संस्था चालक संस्था चालवण्यास असमर्थ असतील तर त्यांनी ती शाळा गावकऱ्यांच्या स्वाधीन करावी, आम्ही ती शाळा चालवू, अशी मागणीही निम्हण यांनी केली आहे. 

 

कनिष्ठ महाविद्यालय पाषाण, श्री नागेश्वर विद्यालय निमोणे, तालुका शिरूर या दोन्ही शाळांवर शैक्षिण संस्थेच्या अनियमित कारभारामुळे  २००५ ते २०१४ पर्यंत प्रशासक नेमण्यात आले होते. २०१७ साली संस्था चालकांनी सर्वोच्च न्यायालयातून प्रशासक नेमणुकीवर तात्पुरती स्थगिती आणली होती. पण त्यानंतर संस्थेने शाळेची प्रगती करण्याऐवजी एक एक वर्ग बंद पडत शेवटी शाळाच बंद पाडली, अशी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. दरम्यान, याविषयी कुंजीर यांची भुमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO