SPPU : केवळ ९४ हजार विद्यार्थ्यांचे ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन; निधीअभावी तेही रखडले

येत्या परीक्षेपासून या कामास सुरुवात केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु, निधीची तरतूद नसल्याने अद्याप याबाबतची निविदाच काढली गेली नाही.

SPPU : केवळ ९४ हजार विद्यार्थ्यांचे ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन; निधीअभावी तेही रखडले
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) परीक्षा विभागातर्फे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन (Onscreen evaluation) करण्याचा निर्णय विद्यापीठाचे कुलगुरू (Vice Chancellor) डॉ. कारभारी काळे (Dr. Karbhari Kale) यांनी नुकताच जाहीर केला. येणाऱ्या परीक्षेपासून या कामास सुरुवात केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु, निधीची तरतूद नसल्याने अद्याप याबाबतची निविदाच काढली गेली नाही. त्यामुळे ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशनबाबत विद्यापीठ प्रशासन खरंच गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. (Savitribai Phule Pune University)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन ही काळाची गरज असून राज्यातील महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठांमध्ये या पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत मॉडरेटर व शिक्षकांना ऑनलाईन लॉगिन आयडी दिला जातो. त्यातून शिक्षकांना ऑनस्क्रीन मूल्यमापनासाठी उत्तरपत्रिका दिल्या जातात. ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आपोआप जनरेट होतात. विविध विषयांत मिळालेल्या गुणांची प्रोसेसिंग होऊन संबंधित विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तयार होते. त्यामुळे उशीरा का होईना विद्यापीठाने ही पध्दत स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

या संदर्भातील निविदा पुढील आठ दिवसांत काढाली जाईल, असे विद्यापीठातर्फे ३ एप्रिल २०२३ रोजी स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, निविदा काढण्यास अजून आठ दिवसांचा कालावधी लागेल,असे विद्यापीठातील अधिकारी सांगत आहेत. येत्या एक ऑगस्टपासून नियमितपणे शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकाल जुलै महिन्यात जाहीर करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : मेडिकल, इंजिनिअरिंग शिका आता मराठीतून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचे विद्यापीठासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे सुरुवातीला पदवीधर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ऑनस्क्रीन तपासून या विद्यार्थ्यांचा निकाल लवकर जाहीर करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. मात्र त्यासाठीची सुरुवातच अद्याप झाली नसल्याने विद्यापीठ याबाबत किती गंभीर आहे,असा प्रश्न निर्माण होतो.   

पदवीधर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम कमी झाल्यास परीक्षा विभाग इतर विषयांचे निकाल अधिक जलद गतीने लावू शकेल, असा विश्वास विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे केवळ ९३ हजार ९२८ विद्यार्थी आहेत. तर विद्यापीठाच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या साडेसात लाखांच्या घरात आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल नियोजित कालावधीत प्रसिद्ध करून १ ऑगस्ट पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्याचे मोठे आव्हान विद्यापीठासमोर आहे.

‘’ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशनची निविदा काढण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्यवस्थापन परिषदेकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर येत्या आठवड्याभरात ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशनची निविदा काढली जाईल.’’ 
- डॉ.महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची विद्याशाखा निहाय आकडेवारी      
आर्ट्स :- १०,१६४
एज्युकेशन :- ८३१
सायन्स :- १९,१८३
इंजीनियरिंग :- २,६४७
कॉमर्स :- १३,८५९
मॅनेजमेंट :-४४,००२
फार्मसी :- ३,३४२