पुण्यातील शिक्षकांचे 'शालार्थ आयडी'साठी शिक्षक दिनी उपोषण

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघाने शिक्षकांच्या या आंदोलनाचे समर्थन केले असून या शिक्षकांसह महासंघाचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी होणार आहेत.

पुण्यातील शिक्षकांचे 'शालार्थ आयडी'साठी शिक्षक दिनी उपोषण
Shalarth ID

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शाळांमधील (Schools in Maharashtra) शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शालार्ड आयडीसाठी (Shalarth ID) परवड सुरूच आहे. अनेकजण वैयक्तिकपणे आंदोलनाचे हत्यार उपसत आहेत तर काही संघटनाही शिक्षण विभागाच्या (School Education Department) कार्यालयांसमोर आंदोलन करत आहेत. पण त्यानंतरही हा प्रश्न सुटत नसल्याने आता शिक्षक दिनीच (National Teachers Day) शिक्षकांना उपोषण करण्याची वेळ आली आहे. शालेय शिक्षण विभागाने जवळपास सात महिन्यांपूर्वी अनुदान मंजूर करूनही पुणे शहरातील ५७ शाळांमधील प्राथमिक शिक्षकांना शालार्थ आयडी मिळालेला नाही. त्यामुळे या शिक्षकांनी शिक्षक दिनीच दिवसभर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघाने शिक्षकांच्या या आंदोलनाचे समर्थन केले असून या शिक्षकांसह महासंघाचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी होणार आहेत. पुणे महापालिका हद्दीतील खाजगी प्राथमिक शाळांमधील २० टक्के अनुदान प्राप्त शिक्षकांना शालार्थ आयडी व ११ मुद्द्यांना अनुसरून फाईल तपासणी करून, अद्यापपर्यंत निर्णय प्रलंबित ठेवला आहे.

मुक्त विद्यालय मंडळ : इयत्ता पाचवी व आठवीसाठी शुक्रवारपासून नोंदणी

सर्व शिक्षक दि. ५ सप्टेंबर रोजी म्हणजे शिक्षक दिनी सकाळी १० ते ६ या वेळेत एकदिवसीय उपोषण करणार आहेत. याविषयी महासंघाचे पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष नारायण शिंदे दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात सुमारे शंभर शाळांना २० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी ५७ शाळा पुणे महापालिकेच्या हद्दीतील आहेत. या शाळांमधील ५७ शिक्षक जवळपास सात महिन्यांपासून शालार्ड आयडीच्या प्रतिक्षेत आहेत.

माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे शालार्ड आयडीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. पण पुणे महापालिकेतील शिक्षण अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ५७ शिक्षकांचे नुकसान होत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने शिक्षकांमध्ये संतापाची भावना आहे. अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने आम्ही राष्ट्रीय शिक्षक दिनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. सर्व ५७ शिक्षकांसह महासंघाचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सभागी होणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo