मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सीट लीव्हिंग बॉण्ड रद्द

मध्यप्रदेश हे पहिले राज्य आहे जिथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा सोडण्याचे बंधन धोरण रद्द करण्यात आले आहे.

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सीट लीव्हिंग बॉण्ड रद्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET UG  2024 संदर्भात सुरू असलेल्या गदारोळात एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएस (BDS)मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखेर सीट लीव्हिंग बॉण्ड रद्द(Seat leaving bond cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यप्रदेश (MP) हे पहिले राज्य आहे जिथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा सोडण्याचे बंधन धोरण रद्द करण्यात आले आहे.

मध्यप्रदेश सरकारच्या नवीन निर्णयानुसार, सरकारी महाविद्यालय (Govt College)असो किंवा खाजगी (Private) विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएसच्या जागा सोडण्यासाठी बॉण्ड भरण्याची गरज नाही. विद्यार्थ्याने कोणत्याही कारणाने त्यांचा अभ्यास अर्धवट सोडलात तर त्यांना मोठी रक्कम भरावी लागणार नाही. या निर्णयामुळे 30 ते 40 लाख रुपयांची थेट बचत होणार आहे. त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पूर्वीच्या नियमांनुसार, एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी महाविद्यालये  विद्यार्थ्यांना बॉण्ड भरायला लावतात. त्यात असे लिहिले आहे की, जर विद्यार्थ्याने कोणत्याही कारणास्तव अभ्यासक्रम पूर्ण केला नाही आणि कॉलेजमध्येच सोडले तर त्याला ठराविक रक्कम कॉलेजला भरावी लागेल. ही रक्कम 5 लाख ते 40 लाख रुपयांपर्यंत आहे, परंतु अनेक महाविद्यालयांमध्ये ती यापेक्षाही अधिक आहे.

दरम्यान, यावर्षी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला होता. नॅशनल मेडिकल कमिशनने (National Medical Commission) 2024च्या सुरूवातीला सांगितले होते की,  “आम्हाला या बॉण्डबाबत आयोगाकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते. या नियमामुळे विद्यार्थी तणाव, चिंता आणि नैराश्याचे बळी ठरत आहेत." हे लक्षात घेऊन कमिशनने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा सोडण्याचे बॉण्ड रद्द करण्यास सांगितले होते.