NEET EXAM: नवीन खुलासा; परीक्षेला बसला डमी विद्यार्थी

नवी मुंबईत नीट परीक्षेला चक्क डमी विद्यार्थी बसल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

NEET EXAM: नवीन खुलासा; परीक्षेला बसला डमी विद्यार्थी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नीट परीक्षेत (NEET Exam Scam Case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य देखील धोक्यात आले आहे. नीट प्रकरणात महाराष्ट्राचं कनेक्शन (Maharashtra Connection) समोर आले असताना, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय नीट परीक्षांच्या पेपरफुटीचं रॅकेट लातूर (Latur) येथून कार्यरत असल्याचा खुलासा या प्रकरणात झाला आहे. तर आता नवी मुंबईत (Navi Mumbai) नीट परीक्षेला चक्क डमी विद्यार्थी (Dummy student) बसल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकाच खळबळ उडाली आहे.  

महाराष्ट्रातील लातूर येथील NEET पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या डमी विद्यार्थ्यांचं नवी मुंबईतील प्रकरण देखील सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, ज्यावेळी परीक्षा केंद्रावर आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी केली जात होती. परीक्षेला बसलेल्या आरोपी विद्यार्थ्याच्या तपशीलाशी ती माहिती जुळत नव्हती, तेव्हा केंद्र प्रभारींना सुरुवातीला वाटलं की, काही तांत्रिक बिघाडांमुळे हे घडलं असावं. त्यानंतर प्रभारींनी त्यांना परीक्षा देण्याची परवानगी दिली. मात्र, परीक्षा संपल्यानंतर पुन्हा त्या विद्यार्थ्याची बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली यावेळी सुध्दा त्यांची माहिती जुळली नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी तो विद्यार्थी डमी उमेदवार असल्याचं उघड झालं. हा डमी उमेदवार जळगाव येथे राहत असल्याचीही माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी डमी विद्यार्थिनीची चौकशी केली असता, आर्थिक गरजेपोटी तिने हे केलं असल्याचं उघड झालं. तिच्यासोबत एक व्यक्ती राजस्थानातून नवी मुंबईत आली होती, जो तिला परीक्षा केंद्राबाहेर भेटला होता. तो बाहेरच वाट पाहत होता, पण पोलीस परीक्षा केंद्रात हालचाल होताच त्यानं तिथून पळ काढला. या प्रकरणाचा तपासही आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.