राज्यातील 'त्या' आठशे शाळा सरकारच्या रडारवर

पुणे मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच काही शिक्षण संस्था चालकांनी शाळा सुरू केल्या.

राज्यातील 'त्या' आठशे  शाळा सरकारच्या रडारवर
Education Commissioner Suraj Mandhare

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क/ पुणे

राज्यात बोगस शाळा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागातर्फे (Education Department) करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल ८०० शाळांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे समोर आले. त्यामुळे या शाळा बोगस असल्याचे दिसून येत आहे. शाळांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागणार आहे. त्यामुळे यापुढील काळात पालकांनी सुद्धा शाळा मान्यताप्राप्त आहे किंवा नाही याची खातरजमा करूनच विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी केले आहे. (Eight Hundred Schools in maharashtra are fake)

पुणे मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच काही शिक्षण संस्था चालकांनी शाळा सुरू केल्या. त्यातच सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिले जाणारे बनावट प्रमाणपत्र विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. प्रथमतः पुण्यातील तीन शाळांची नावे राज्याच्या शिक्षण विभागाने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे पाठवली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने तपासणी मोहीम सुरू केली.     

आरटीईच्या विद्यार्थ्यांशी दुजाभाव केल्यास याद राखा!

याविषयी माध्यमांना माहिती देताना सुरज मांढरे म्हणाले, पुण्यासह राज्यातील सुमारे तेराशे शाळांची तपासणी करण्यात आली. त्यात ८०० शाळांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. मात्र, सुमारे शंभर शाळांना आपल्याकडे बनावट कागदपत्र असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून शाळा बंद केल्या. बंद झालेल्या शाळेतील मुलांना इतर शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. आता या ८०० शाळांमधील कागदपत्रांची नीटपणे तपासणी करून दोषी शाळांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल.                                     

आरटीई प्रवेश मिळवून देतो म्हणणाऱ्यावर होणार गुन्हा दाखल           

आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यात कोणत्याही शिक्षण अधिकाऱ्याला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे आरटीईतून प्रवेश मिळवून देतो, असे सांगून जर कोणी पालकांची फसवणूक करत असेल तर संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल. पालकांनी जागरूक राहून या संदर्भातील माहिती शिक्षण विभागाला कळवावी, असे आवाहन सुरज मांढरे यांनी केले.