रेल्वेच्या मेगाब्लाॅकमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द; परीक्षेची सुधारित तारीख जाहीर

१ जून रोजी होणाऱ्या दोन्ही परी ८ जून रोजी होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली आहे.

रेल्वेच्या मेगाब्लाॅकमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द; परीक्षेची सुधारित तारीख जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मध्य रेल्वेने (Central Railway) जाहीर केलेल्या ६३ तासांच्या मेगाब्लॅकमुळे (Megablock) मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) फटका बसला आहे.विद्यापीठावर पुर्वनियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली आहे. १ जून रोजी असलेल्या बीएमएस (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र ८ ची एक परीक्षा आणि अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ ची एक परीक्षा अशा दोन परीक्षा होणार होत्या. मात्र, या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या असून १ जून रोजी होणाऱ्या दोन्ही परीक्षा  येत्या ८ जून रोजी होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा (University Exams) आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली आहे.

मध्य रेल्वेकडून सीएसएमटी आणि ठाणे स्थानकातील फलाटाची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी तब्बल ६३ तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला. यामुळे लोकल ट्रेनच्या ९०० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेने घेतलेल्या या मेगाब्लॉकचा फटका प्रवाशांसह मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांना देखील बसला आहे. 

रेल्वे प्रशासनाने या मेगाब्लॉकची पूर्वसुचना दिली असल्यामुळे अनेक कार्यालयांना आज सुट्टी देण्याचा, तर काहींना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठानेही त्यांच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील सुधारित वेळापत्रक परिपत्रकाच्या माध्यमातून विद्यापीठाने ही घोषणा केली.