पुणे विद्यापीठात सहकार क्षेत्रातील संशोधन केंद्र सुरु होणार

विद्यापीठातील पद्मश्री डॉ. विखे पाटील अध्यासन आणि नॅशनल युवा को ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन.

पुणे विद्यापीठात सहकार क्षेत्रातील संशोधन केंद्र सुरु होणार
Union Minister Dr. Bhagwat Karad

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेला तिसऱ्या स्थानावर पोहोचण्यासाठी देशातील प्रामुख्याने युवा वर्गाला बरोबर घेऊन एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी रविवारी पुण्यात केले. यावेळी आगामी काळात नॅशनल युवा को ऑपरटिव्ह सोसायटीच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) सहकार क्षेत्रातील संशोधन केंद्र सुरू केले जाईल, अशी घोषणा प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे (Dr. Sanjeev Sonawane) यांनी यावेळी केली.

विद्यापीठातील पद्मश्री डॉ. विखे पाटील अध्यासन आणि नॅशनल युवा को ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी युवा सोसायटीचे अध्यक्ष राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते. युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी युवकांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आवाहन कराड यांनी यावेळी केले.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी नॅशनल युवा सोसायटी सारख्या संस्थांनी काम करावे, यासाठी त्यांना नाबार्ड सारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेशी जोडून देण्यात येईल. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण असलेला देश असल्याने त्यांच्या जोरावर भारताला महाशक्ती बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असून गेल्या आठ वर्षांच्या काळात केंद्र सरकारने विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये ३९ हजार सुधारणा केल्या असल्याचे डॉ. कराड म्हणाले.

नवे तंत्रज्ञान आणि नवे विचार आत्मसात करण्यात देशातील युवा वर्ग आघाडीवर असल्याने त्यांच्या क्षमतेला प्रोत्साहन देऊन देश जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करीत असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. अध्यासनाचे प्रमुख डॉ. मुकुंद तापकीर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांचेही यावेळी भाषण झाले.