प्राध्यापकांच्या प्रश्नासाठी नवप्राध्यापक संघटनेचा पुन्हा यल्गार

प्राध्यापकांच्या प्रश्नासाठी नवप्राध्यापक संघटनेचा पुन्हा यल्गार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात सहाय्यक प्राध्यापक पदाची रिक्त पदे भरण्यास तात्काळ परवानगी द्यावी. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना प्रति तास 15 हजार रुपये मानधन द्यावे.तासिका तत्त्वावरील अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरण्यात यावा. तसेच सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे. आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या वतीने येत्या १६ व १७ नोव्हेंबर रोजी दोन दिवस मॉडेल कॉलनी येथील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.

हेही वाचा : परदेशी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिका पहिली पसंती

राज्यात सध्या काही रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या पदाची भरती प्रक्रिया सुरू असली तरी २०१७ च्या आकृतीबंधास मंजुरी देऊन १०० टक्के सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना दर महिन्याला मानधन मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार सीएसबी धारक प्राध्यापकांना १५ हजार रुपये प्रति तास याप्रमाणे वर्षातील ११ महिने मानधन द्यावे. राज्यातील २००१ पासूनच्या कायम विना अनुदानित व विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी देण्यात आलेल्या महाविद्यालयांना आणि तुकड्यांना त्वरित अनुदान द्यावे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा तात्काळ भराव्यात, या मागणीसाठी धरणे आंदोलन केले जाणार आहे.

उच्च शिक्षण विभागातील शिक्षण सहसंचालक डॉ प्रकाश बच्छाव यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी तत्कालीन संचालक डॉ.धनराज माने यांनी सुरू केली होती. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे. तसेच सहसंचालक स्तरावर सहाय्यक प्राध्यापक पदभरतीचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी,आदी मागण्यासाठी दोन दिवस धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी सांगितले.