शाळांना बोगस कागदपत्र देणाऱ्यांवर कारवाई कोण करणार?

शाळा सुरू करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून आवश्यक कागदपत्र घेणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक शाळांनी ही कागदपत्रे घेतले नसल्याचे समोर आले तर काही शाळांकडे बनावट कागदपत्र असल्याचे निदर्शनास आले.

शाळांना बोगस कागदपत्र देणाऱ्यांवर कारवाई कोण करणार?
Maharashtra Schools News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील तब्बल ८०० शाळांकडे बनावट कागदपत्र (Forged Documents) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाळांवर (Schools) गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी नुकतीच दिली. अशी धडक कारवाई करणारे ते पहिलेच शिक्षण आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या टीमचे आम्ही संस्थाचालक प्रथमतः अभिनंदन करतो. मात्र, शाळांना बनावट कागदपत्र देणाऱ्या शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा सवाल महाराष्ट्र राज्य संस्था चालक महामंडळाच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी वाचत रहा https://eduvarta.com/

शाळा सुरू करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून आवश्यक कागदपत्र घेणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक शाळांनी ही कागदपत्रे घेतले नसल्याचे समोर आले तर काही शाळांकडे बनावट कागदपत्र असल्याचे निदर्शनास आले. शासन मान्यता प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र अशी विविध कागदपत्र संस्थाचालकांना शिक्षण विभागातीलच कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहेत. आता हीच कागदपत्र बनावट असल्याचे शिक्षण खात्याकडून सांगितले जात आहे. शिक्षण खात्याकडून एक नाही दोन नाही तर तब्बल ८०० बनावट कागदपत्र कशी दिली जाऊ शकतात, असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या उपाध्यक्ष जागृती धर्माधिकारी यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना उपस्थित केला.

राज्यातील 'त्या' आठशे शाळा सरकारच्या रडारवर

धर्माधिकारी म्हणाल्या, शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र मिळवण्यासाठी संस्थाचालकांकडून शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडेच पत्रव्यवहार केला जातो. संस्थाचालक स्वतः बोगस कागदपत्र तयार करत नाहीत. त्यातच बोगस कागदपत्र देणारी टोळी अस्तित्वात असल्याची माहिती शिक्षण विभागाने केलेल्या चौकशी अहवालातूनच समोर आली आहे. त्यामुळे संस्थाचालकांवर किंवा शाळांवर कारवाई करण्यापूर्वी बोगस कागदपत्र देणाऱ्यांवर शिक्षण विभाग काय कारवाई करणार याचे उत्तर विभागाने द्यायला हवे.

"आम्ही दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी आमच्या शिवाय दुसरे कोणी करणार नाही. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका? असे शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी सांगतात. अशा कर्मचाऱ्यांना शिक्षण विभाग अभय देणार आहे का ? हे आधी स्पष्ट व्हायला हवे."

- जागृती धर्माधिकारी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्था चालक महामंडळ