MPSC ला मॅट ची चपराक ; निकाल जाहीर करताना नियमांचे उल्लंघन, पुन्हा याद्या जाहीर होणार

येत्या 4 जून पर्यंत आयोगाला पुन्हा सुधारित याद्या प्रसिद्ध करून शासनाकडे शिफारस करायची आहे.यामध्ये आयोगाने पुन्हा काही नियमबाह्य काम केल्यास 15 जुन रोजी पुन्हा दाद मागण्याची मुभा मॅट ने उमेदवारांना दिली आहे.

MPSC ला मॅट ची चपराक ; निकाल जाहीर करताना नियमांचे उल्लंघन, पुन्हा याद्या जाहीर होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  (Maharashtra Public Service Commission) 2023 चा एसटीआय आणि दुय्यम निबंधक पदांचा मुख्य परीक्षेचा निकाल (गट ब व गट क पूर्व परीक्षा 2023) जाहीर (Mains Exam Result Declared) करत सर्व साधारण यादी प्रसिद्ध केली. मात्र, निकाल जाहीर करताना आयोगाने स्वत:च तयार केलेल्या नियमावलीचे उल्लंघन (Violation of regulations)केले होते.त्यावर काही विद्यार्थ्यांनी मॅट (Mat) गेले होते. याबाबत मॅट ने विचारणा केली असता आयोगाकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्यावर '' प्रश्न रोजगाराचा आहे त्यामुळे नियम पाळणे आवश्यक आहे'' ,अशा शब्दांत मॅट ने आयोगाला सुनावले.तसेच आयोगाने पुन्हा चूक केल्यास 15 जुन रोजी पुन्हा दाद मागण्याची मुभा मॅट ने उमेदवारांना दिली आहे.

एमपीएससीतर्फे जाहिरात क्रमांक एनओटी -3617/ सीआर-130/ 2022 नुसार सहायक कक्ष अधिकारी, गट ब (अराजपत्रित), राज्य कर निरीक्षक , पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक यासाठी एकूण 746 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. 15 सप्टेंबर 2023 च्या जाहिरातीमध्ये सर्व माहिती तपशीलवार देण्यात आली. त्यात प्रामुख्याने निकाल कसा प्रसिद्ध केला जाईल हे सुध्दा नमूद करण्यात आले होते. सर्व साधारण गुणवत्ता यादी ही कशी प्रसिध्द होईल, याबाबत सविस्तर तपशील दिला होता. शारीरिक चाचणी व मुलाखतीनंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गांकरिता मुख्य पेपर (पेपर कामांक -1 व पेपर क्रमांक-2) तसेच मुलाखातीमध्ये प्राप्त एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ताक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल,असे नियम क्रमांक 11.1.1 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.तसेच सहायक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक , पोलीस उपनिरीक्षक तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-1) मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या निवडीकरिता मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ताक्रमांकानुसार यादी तयार करण्यात येईल,असे 11.1.2 मध्ये नमूद केले होते.मात्र हे दोन्ही नियम डावलले गेले.त्याचाप्रमाणे संवर्ग किंवा पदाचा पसंतीक्रम देण्याबाबतही स्वतंत्र नियम दिले आहेत.परंतु, आयोगाने हे दोन्ही नियम डावलून थेट गुणवत्ता याद्या जाहीर केल्या.त्यामुळे काही उमेदवार मॅट मध्ये गेले होते.

मॅट ने आयोगाला याबाबत विचारले असता आयोगाकडे यांचे कोणतेही उत्तर नव्हते. आयोगाकडून केवळ शिफारस पत्र शासनाकडे गेले आहेत. आता नियम पाळणे कठीण आहे असे उत्तर देण्यात आले.मॅट ने यावर आयोगाला खडे बोल सुनावले आणि प्रश्न रोजगाराचा आहे त्यामुळे नियम पाळणे आवश्यक आहे,असे स्पष्टपणे सांगितले.

मॅट ने आयोगाला पुनरावृत्ती उमेदवार संख्या विचारली असता आयोगाकडून माहिती दिली की, एकूण 96 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांची नावे दुय्यम निबंधक (SR) आणि सहायक कक्ष अधिकारी (ASO) यांच्या यादीत पुनरावृत्ती झाली आहेत .दुय्यम निबंधक (SR), सहायक कक्ष अधिकारी (ASO) आणि राज्यकर निरीक्षक (STI) यांच्या यादीमध्ये 2 उमेदवारांची पुनरावृत्ती झाली असून विक्रीकर निरीक्षक (STI) आणि सहायक  कक्ष अधिकारी (ASO) यांच्या यादीमध्ये 80 उमेदवारांच्या नावांची पुनरावृत्ती झाली आहे. परिणामी एमपीएससीने अद्याप जाहीर न केलेल्या सहायक कक्ष अधिकारी  (ASO) च्या एकूण 164 उमेदवारांच्या शिफारसी पाहता 96 उमेदवारांची पुनरावृत्ती होत आहे.त्यामुळी ही संख्या तब्बल 60 टक्क्यांपेक्षा मोठी संख्या आहे. तसेच ही संख्या केवळ शिफारस पात्र ठरत असलेल्या यादीतील आहे.

आता मॅटकडून प्राप्त आदेशानुसार आयोगाला जो पर्यंत एका उमेदवाराला एक पद मिळत नाही तो पर्यंत याद्या जाहीर कराव्या लागतील.येत्या 24 मे रोजी किंवा पूर्वी  आयोगाने दुय्यम निबंधक आणि राज्यकर निरीक्षक पदासाठी निवड झालेले उमेदवार आहेत, त्यांना पत्र पाठवून विचारण्यात येईल की ते कोणते पद  घेणार आहेत आणि कोणते पद सोडणार आहेत. येत्या 30 मे रोजी किंवा पूर्वी सहायक कक्ष अधिकारी पदी निवड झालेल्या उमेदारांना सुद्धा पत्र पाठवून आता आयोग विचारणा करणार आहे. येत्या 4 जून पर्यंत आयोगाला पुन्हा सुधारित याद्या प्रसिद्ध करून शासनाकडे शिफारस करायची आहे.यामध्ये आयोगाने पुन्हा काही नियमबाह्य काम केल्यास 15 जुन रोजी पुन्हा दाद मागण्याची मुभा मॅट ने उमेदवारांना दिली आहे.

---------------------

" महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वारंवार होत असलेले नियमबाह्य वर्तन महाराष्ट्राला अपेक्षित नाही. खास करून सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या लक्ष्यात या चुका येवून देखील त्यावर योग्य ते उपाय केले जात नाहीत हा निंदनीय प्रकार आयोगाच्या प्रतिष्ठेला नुकसान करत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष यांनी सुद्धा यात लक्ष देऊन सचिव सहसचिव यांना योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे कारण प्रश्न उमेदवारांच्या आयुष्याचा आहे."

- आजम शेख , माहिती अधिकार कार्यकर्ते