‘आयटीआय’ विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; चाळीस वर्षांनंतर विद्यावेतनात भरघोस वाढ

प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यापैकी ५० टक्के पर्यंत पात्र प्रशिक्षणार्थ्यांना विभागनिहाय दायित्व पेलून ४० व ६० रुपये अशा अत्यल्प दराने विद्यावेतन दिले जात आहे.

‘आयटीआय’ विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; चाळीस वर्षांनंतर विद्यावेतनात भरघोस वाढ
ITI News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश घेतलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना राज्य सरकारकडून (Maharashtra Government) दर महा पाचशे रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी शासनाकडून जारी करण्यात आला आहे. मागील चाळीस वर्षांत पहिल्यांदाच विद्यावेतनात (Stipend) भरघोस वाढ करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (ITI Students)

 

‘आयटीआय’मधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून विद्यावेतन देण्यात येते. विद्यावेतनाच्या दरामध्ये मागील ४० वर्षात कोणताही बदल करण्यात असलेला नाही. प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यापैकी ५० टक्के पर्यंत पात्र प्रशिक्षणार्थ्यांना विभागनिहाय दायित्व पेलून ४० व ६० रुपये अशा अत्यल्प दराने विद्यावेतन दिले जात आहे. सध्याच्या महागाई निर्देशांकाचा विचार करता शैक्षणिक साहित्याच्या किमतीमध्ये व वाहतुकीच्या खर्चामध्ये झालेली वाढ व प्रशिक्षणाचे अनुषंगाने होणारा इतर खर्च सद्यस्थितीतील विद्यावेतनातून भागविणे शक्य नाही. बहुतांश प्रशिक्षणार्थी सामाजिक, आर्थिकदृष्टया मागासवर्गातील असल्याचे वास्तव लक्षात घेता विद्यावेतनाच्या दरामध्ये वाढ करण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

'स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी ‘आधार’ योजना

 

शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक समाजातील व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील प्रशिक्षणार्थी विद्यावेतनासाठी पात्र आहेत. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या मर्यादेत आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दर महा ५०० रुपये इतके दराने विद्यावेतन देण्यात येईल. तसेच विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.  

 

शासनाने वेळोवेळी नॉनक्रिमिलेअर बाबत सुधारित केलेली उत्पन्न मर्यादा लागू राहील. योजनेचा लाभ हा कुटुंबातील केवळ दोन अपत्यांपर्यंत मर्यादित राहील. हा लाभ दर तीन महिन्याच्या हप्त्यात देण्यात येईल. प्रति तीन महिन्याच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थ्यांची नियमानुसार ८० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. दोन वर्षीय व्यवसायातील अभ्यासक्रमातील दुसऱ्या वर्षाचा लाभ मिळण्यासाठी प्रशिक्षणार्थी प्रथम वर्ष, प्रशिक्षण कालावधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

 

ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे. अशा विद्यार्थ्यांना, केंद्र शासनाने, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आयटीआय मधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विहीत केलेल्या दराने शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख ते आठ लाख या मर्यादेत आहे, त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j