‘स्त्री सक्षमीकरणाचा वसा’ - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

विधवांची दीन स्थिती सुधारण्यासाठी त्यांना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे, या विचारातून थोर समाजसेवक, स्त्री शिक्षणाचे शिल्पकार भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यातील हिंगणे येथे १४ जून १८५६ यादिवशी महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेची पायाभरणी केली.

‘स्त्री सक्षमीकरणाचा वसा’ - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
Maharshi Karve Stree Shikshan Sanstha

वारसा ज्ञानदानाचा : लेखमाला - भाग २

‘शीलं परं भूषणम्’ या बोधवाक्याला धरून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (Maharshi Karve Stree Shikshan Sanstha) मागील १२७ वर्षे अविरतपणे कार्यरत आहे. स्थापनेपासूनचा जो विचार भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (Maharshi Dhondo Keshav Karve) यांनी मांडला, त्याच विचाराने या संस्थेने शैक्षणिक (Educational) आणि सामाजिक (Social) क्षेत्रात आपले भरीव असे योगदान सुरू ठेवले आहे. फक्त आणि फक्त महिला सबलीकरणाचे (Women Empowerment) ध्येय उराशी बाळगून सुरू झालेल्या या प्रवासात आज लाखो महिला, कुटुंबे उजळून निघाली आहेत. यामध्ये समाजातील अनेक घटकांनी हातभारही लावला. त्यामुळे संस्थेच्या या वटवृक्षाची सावली महाराष्ट्रभर (Maharashtra) पसरली आहे. स्त्री शिक्षणाची (Women's Education) बीजे रोवणाऱ्या महर्षी कर्वे म्हणजेच अण्णांनी देशातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना करून इतिहास घडवला. मूळ उद्देशाशी कुठेही तडजोड न करता राष्ट्रीय शिक्षण आणि संस्काराच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणाचा हा यज्ञ आज अखंड सुरू आहे.


अशी सुरू झाली स्त्री शिक्षणाची चळवळ


विधवांची दीन स्थिती सुधारण्यासाठी त्यांना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे, या विचारातून थोर समाजसेवक, स्त्री शिक्षणाचे शिल्पकार भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यातील हिंगणे येथे १४ जून १८५६ यादिवशी महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. त्यावेळी संस्थेचे नाव हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे होते. यादिवशी विधवांच्या शिक्षणाला अनुकूल असलेल्या सद्गृहस्थांची सभा त्यांनी घेतली. त्यामध्येच अनाथ बालिकाश्रम या नावाची संस्था सुरू झाली. एका झोपडीत सुरू झालेला हा बालिकाश्रम पुढे स्त्री शिक्षणाचे तीर्थक्षेत्र ठरले.

शिक्षणामुळे स्त्री आत्मनिर्भर बनेल, कर्तृत्वदक्ष बनले, ती सशक्त झाली तर कुटुंब सशक्त होईल, अशी अण्णांची धारणा होती. सुरूवातीला संस्थेत केवळ चारच मुली होत्या. संस्थेचे कार्य पुढे अधिक विस्तारावे यासाठी अण्णांनी त्यावेळी स्वत:ची सर्व शिल्लक अर्पण केली. अनेक अडचणी आल्या, खडतर प्रवास करावा लागला. पण त्यावर मात करून अण्णांनी हे कार्य जोमाने सुरू ठेवले. त्यामुळे  महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेत आज ३२ हजार विद्यार्थिनी व महिला शिक्षण घेत आहेत. आता ही एक चळवळ बनली आहे. संस्थेचे पुण्यात मुख्यालय असून पुण्यासह वाई, सातारा, रत्नागिरी, कामशेत व नागपूर येथे ७२ सामाजिक व शैक्षणिक शाखा कार्यरत आहेत. एकूण २१ शाळा, नऊ बालवाड्या आणि १८ महाविद्यालये कार्यरत आहेत.

 

पाळणाघर ते पीएचडी

 
मागील १२७ वर्षांच्या संस्थेच्या वाटचालीत महाराष्ट्रभर विस्तार झाला आहे. मुलगी संस्थेत आल्यानंतर ती पीचडी करून, स्वावलंबी बनूनच बाहेर पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पाळणाघर, बालवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, नर्सिंग, फॅशन डिझायनिंग व ज्वेलरी डिझायनिंग व निर्मिती, विविध कौशल्य अभ्यासक्रम, भाषा केंद्र, डेटा अनॅलिसिस सेंटर, ऑडिओ व्हिज्युअल अभ्यासक्रम, टायपिंग व विविध विषयांचे प्रशिक्षण, बाया स्त्री अभ्यास व संशोधन केंद्र असे विविध अभ्यासक्रम, शिक्षणातून महिलांना सशक्त करण्यासाठी संस्थेने कंबर कसली आहे. 

संस्थेच्या या वाटचालीत १९९० चे दशक अभिनव ठरले. संस्थेच्या विचारांशी कुठेही तडजोड न करता उच्च शिक्षणामध्ये संस्थेने पाय रोवण्यास सुरूवात केली. त्यावर्षी सिध्दीविनायक महाविद्यालय सुरू झाले. त्यानंतर १९९१ मध्ये कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय उभे राहिले. आज विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये संस्थेच्या लौकिकात भर टाकत असून मुलींच्या सक्षमीकरणाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. उच्च दर्जाचे शिक्षण-प्रशिक्षण, अत्याधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा, नाविण्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ, काळानुरूप करण्यात आलेले बदल आदी कारणांमुळे आंतराराष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयांनी आपला ठसा उमटविला आहे. 

यावरच न थांबता संस्थेने पुढील काळात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्याचप्रमाणे अण्णांनी १९४० मध्ये महिलांसाठी सुरू केलेला ‘कृष्ण तलाव’ अद्ययावत केला जाणार असून त्यावर ऑलिंपिकच्या दर्जाची स्पोर्टस् अकॅडमी उभी केली जाणार आहे. त्यामध्ये रोप मल्लखांब, कबड्डी, जलतरण, जिम्नॅस्टिक अशा विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाईल, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा भरविल्या जातील. महिला खेळाडूंच्या निवासाची व्यवस्थाही असणार आहे. अत्याधुनिक सुविधायुक्त ही अकॅडमी मुलींमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी एक महत्वपूर्ण ठरेल. 

शिक्षणाला सामाजिक कार्याची जोड


संस्थेने शिक्षणाला सामाजिक कार्याची जोड देत अण्णांच्या विचारांची ज्योत अव्याहतपणे तेवत ठेवली आहे. कोरोना काळात संपूर्ण मानवजातीवर मोठे संकट ओढवले होते. त्यामुळे अनेक पालकांना शाळेचे शुल्क भरणे शक्य नव्हते. त्यावेळी संस्थेने ‘भाऊबीज’ आणि ‘संकल्प ३६५’ असे उपक्रम सुरू करून पालकांना आधाराचा हात दिला. या उपक्रमातून सुमारे दीड कोटी रुपये जमा झाले. हे उपक्रम आजही सुरूच आहेत. त्यातून गरजू मुलींच्या शिक्षणाला हातभार लावला जातो. त्याचप्रमाणे संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृह व डेक्कन येथील महिला निवासमध्ये कोरोना सेंटर सुरू करण्यात आले होते. तसेच १५ हजार जेवणाच्या डब्यांची व्यवस्था, २५०० जणांचे लसीकरण आणि रक्तदान शिबीरांचेही आयोजन करण्यात आले.

कामशेत, पुणे, नागपूर, रत्नागिरी या ठिकाणी बारा वसतिगृह असून त्यामध्ये जवळपास सहा हजार मुली राहतात. कामशेतमध्ये १९८९ मध्ये आश्रमशाळा सुरू झाली. काम करणाऱ्या महिलांसाठी तीन महिला निवास आहेत. हिंगण्यामध्ये दहा महिला इमारत बांधून तयार असून केवळ काम करणाऱ्या महिलांसाठी या इमारतीमध्ये व्यवस्था असेल. सर्व अत्याधुनिक सुविधा तिथे दिल्या आहेत. अत्यंत सवलतीच्या दरामध्ये मुलींना अशा सुविधा पुरविल्या जात असल्याने महाराष्ट्रभरातील हजारो विद्यार्थिनींना त्याचा फायदा होत आहे. गरजू विद्यार्थिनींसाठी कमवा शिका योजना असून त्यातून त्यांना पैसे मिळतात. असे अनेक उपक्रम संस्थेमध्ये राबविले जातात.

१९३४ सालापासून वेणुबाई वसतिगृहामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह चालविले जाते. या बालगृहात इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. अनाथ, एकच पालक असलेल्या, पालक जबाबदारी नाकारत असलेल्या, अशा विविध कारणास्तव मुली संस्थेत येतात. मुली संस्थेच्या पालकत्वाखाली असल्यामुळे त्या १८ वर्षे पूर्ण होईपर्यं त्यांच्या संपूर्ण जबाबदारी संस्थेची असते. संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या आईला विविध कौशल्य शिक्षण देण्याचा उपक्रमही संस्थेकडून राबविला जात आहे. आज हजारो महिलांना या उपक्रमामुळे रोजगार मिळाला आहे. 

संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात आपुलकीची भावना अधिक दृढ होत गेली ती ‘वाडा संस्कृती’च्या आग्रहामुळे. ज्याप्रमाणे वाड्यात राहणारी कुटुंबे एकमेकांना साथ देत, सांभाळून घेत, सुख-दु:खात सहभागी होतात, त्याचप्रमाणे संस्थेतील प्रत्येक जण एकोप्याने काम करत आहे. संस्थेत प्रेम, ओलावा टिकवून ठेवणारी ही ‘वाडा संस्कृती’ रुजविण्याचे काम करत संस्था यशाचे एक-एक शिखर पार करत पुढे जात आहे.


- रवींद्र देव, कार्याध्यक्ष, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे

(शब्दांकन - राजानंद मोरे)