सरसकट फेलोशिपसाठी संशोधक विद्यार्थ्यांचा सारथीवर संयुक्त मोर्चा ; विद्यार्थ्यांमध्ये संतप्त भावना

यापुढे परीक्षा नको तर सरसकट फेलोशिप द्या, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत सारथी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

सरसकट फेलोशिपसाठी संशोधक विद्यार्थ्यांचा सारथीवर संयुक्त मोर्चा ;  विद्यार्थ्यांमध्ये संतप्त भावना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क


सारखी, बार्टी, महाज्योती (Barti , Sarathi, Mahajyoti) या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सलग दुसऱ्यांदा गोंधळ झाला. त्यामुळे यापुढे परीक्षा नको तर सरसकट फेलोशिप द्या, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत सारथी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

सारखी, बार्टी, महाज्योतीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली जात होते. परंतु, राज्य शासनाने फेलोशिप देण्याच्या नियमावलीत बदल केला. प्रत्येक संस्थेतील दोनशे विद्यार्थ्यांनाच फेलोशिप दिली जाईल, त्यासाठी परीक्षा घेतली जाईल, असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार डिसेंबर महिन्यात परीक्षा झाली परंतु.या परीक्षेत गोंधळ झाल्याने बुधवारी (दि १०) पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. परंतु, या परीक्षेत सीलबंद प्रश्नपत्रिका आणि सील नसलेल्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यावर संतप्त विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे सारथी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच सरसकट फेलोशिपची मागणी लावून धरली. तसेच परीक्षेत गोंधळ होण्यास जबादार असणाऱ्यावर कारवाई करावी,अशी मागणी केली.

हेही वाचा : UGC NET डिसेंबर 2023 परीक्षेचा निकाल पुढे ढकलला ; आता निकाल 17 जानेवारीला

दरम्यान,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने परीक्षेत घडलेल्या प्रकाराबाबत जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पीएचडीच्या संयुक्त चाळणी परीक्षेचे संयोजन बुधवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत पुणे, कोल्हापूर ,नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरातील परीक्षा केंद्रामार्फत करण्यात आले. या परीक्षेसाठी ए बी सी डी अशा चार प्रश्नपत्रिका संचांची छपाई करण्यात आली होती. सदर प्रश्नपत्रिका संचाची छपाई दोन वेगवेगळ्या मुद्रणालयाकडून गोपनीय रित्या करून घेण्यात आली. त्यामुळे छपाई करण्याच्या स्वरूपात बदल झालेला असू शकतो. मात्र, या प्रश्नपत्रिका संचांची अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि विविध सुरक्षा मानकांचे पालन करून करण्यात आलेली आहे. संबंधित परीक्षा केंद्रावर हे परीक्षा संच सीलबंद स्वरूपात पाठविण्यात आले होते. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया देखील सर्व परीक्षा केंद्रावर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. त्यामुळे या परीक्षेच्या पेपर फुटी संदर्भात केलेले आरोप पूर्णतः निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे या प्रकटनात नमूद करण्यात आले आहे.