शेती म्हणजे काय रं भाऊ? शाळेतील पोरंही गिरवणार धडे

तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

शेती म्हणजे काय रं भाऊ? शाळेतील पोरंही गिरवणार धडे
Agriculture will be included in school education

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शाळकरी मुलांना आता शेतीचे धडे (Agriculture Education) दिले जाणार आहे. कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या (School Education) अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना (Students) शेतीविषयक ज्ञान मिळण्यास सुरूवात होणार आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली.

मंत्री सत्तार यांनी याबाबतचा प्राथमिक अहवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे सुपूर्द केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी मंत्री सत्तार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : शाळांनी आता हद्दच केली; शुल्कावर दररोज ५०० रुपयांची दंडवसुली

सत्तार म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्त्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे. कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते उपलब्ध  करुन देण्याची तयारी कृषी विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधातून शेतीचे महत्त्व, उपयोजना, व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव अशा अनेक पैलूंकडे लक्ष  केंद्रित करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा. अभ्यासक्रमाची रचना करताना विद्यार्थ्यांना संबंधित विषयाबद्दल रुची निर्माण होईल, या पद्धतीने असावी, अशी अपेक्षा केसरकर यांनी व्यक्त केली.

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ई. मु. काझी, सहसचिव (कृषि) बाळासाहेब रासकर, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी संचालक (शिक्षण) प्रा. डॉ. उत्तम कदम, संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर, अवर सचिव उमेश चांदिवडे आदींची यावेळी उपस्थित होते.