कुलसचिव पदाच्या मुलाखती जुलै महिन्यात ; अखेर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळणार

कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती येत्या 11 व 12 जुलै रोजी घेतल्या जाणार आहेत.

कुलसचिव पदाच्या मुलाखती जुलै महिन्यात ; अखेर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) कुलसचिव (Registrar)पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. मात्र, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव (Full Time Registrar)मिळणार आहे. विद्यापीठातर्फे कुलसचिव पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छानणी करण्यात आली असून कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती (Registrar Interviews)येत्या 11 व 12 जुलै रोजी घेतल्या जाणार आहेत.त्यामुळे कुलसचिव पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनाही तयारीला लागावे लागणार आहे. 

विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांच्याकडे कुलसचिव पदाचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला. दरम्यान कुलसचिव पदाच्या अर्जासाठी जाहिरात प्रसिध्द करणे ,अर्ज मागवणे व अर्जाची छानणी करणे या प्रक्रियेस बराच वेळ लागला. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचार संहिता जाहीर झाल्यामुळे मुलाखती घेणे शक्य झाले नाही.मात्र, आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या 11 व 12 जुलै रोजी सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

विद्यापीठाने यापूर्वीच पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहेत. विद्यापीठातर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीनुसार 36 पैकी 7 उमेदवार अपात्र होते. त्यामुळे केवळ पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.तसेच तसेच  नवउपक्रम व नव संशोधन सहाचार्य मंडळ संचालक पदासाठी प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सुध्दा जुलै महिन्यात होणार आहेत.